Three people were arrested in the Kumbhephal area with 31 kg of marijuana
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : कुंभेफळ शिवारात कापडी पालाखाली बसून गांजाची विक्री करणाऱ्या दोन महिलांसह पुरवठा करणाऱ्याला ग्रामीण पोलिसांच्या एनडीपीएस सेल आणि करमाड पोलिसांनी संयुक्त छापा मारून बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुरुवारी (दि.२५) करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी ७४ हजारांची रोकड, ३१ किलो गांजा जप्त केला. चंद्रकला ऊर्फ चंदाबाई शेषराव पवार (५२, रा. मांडणा, ता. सिल्लोड, ह.मु. कुंभेफळ), धुप्रदाबाई सुभाष मोहिते (५५, रा. अंबेटाकळी, जि. बुलढाणा, ह.मु. कुंभेफळ) आणि मुनिरखॉ हयातखॉ (४५, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
अधिक माहितीनुसार, एनडीपीएस सेलचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कुंभेफळ शिवार, हॉटेल तोरणासमोरील मोकळ्या जागेत एका कापडी पालाखाली दोन महिला गांजाची विक्री करत असल्याचे समजले.
गुरुवारी गोरे यांनी करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांना सोबत घेऊन संयुक्त पथकासह छापा टाकला. कापडी पालाची झडती घेतली असता, तिथे एका पोत्यामध्ये २१ किलो ४९५ ग्रॅम गांजा मिळून आला. कारवाईत पोलिसांनी ३१ किलो ४११ ग्रॅम गांजा, ७४ हजार ४५० रुपये रोख, दुचाकी असा १० लाख ४ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, एनडीपीएस सेलचे एपीआय दिनकर गोरे, सफौ विक्रम देशमुख, हवालदार वाल्मीक निकम, श्रीमंत भालेराव, करमाड ठाण्याचे पीएसआय दिलीप चौरे, भारत निकाळजे, सोपान डकले, श्याम ढवळे, शकुल बनकर, राहुल पगारे, गणेश खरात, बमनावत, सरला कदम यांच्या पथकाने केली.
तिसरा साथीदार शेकटा येथे ताब्यात
पोलिसांनी तिथे उपस्थित दोन महिलांची चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांचा तिसरा साथीदार जालना रोडच्या दिशेने विक्रीसाठी गेल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने करमाड परिसरात शोधमोहीम राबवली आणि शेकटा येथे दुचाकीने जाणाऱ्या मुनिरखॉ हयातखाँ याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील पोत्याची तपासणी केली असता, त्यातही मोठ्या प्रमाणात गांजा सापडला.