Three arrested for kidnapping and robbing contractor along with his car
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
लघुशंकेला थांबलेल्या ठेकेदाराचे सराईत गुन्हेगारांच्या त्रिकुटाने पिस्तुलाच्या धाकावर कारसह बीड बायपासवरून अपहरण केले. कारमध्ये सुमारे चार तास फिरवीत ३५ हजारांची रोकड, कानातील सोन्याची बाळी चाकूने कापून घेतली. त्यानंतर पत्नी आणि वडिलांना फोन करून पैसे मागविण्यास भाग पाडले. ६९ हजार व सोन्याची बाळी, असा ऐवज लुटला. गुन्हेगारांनी एका ठिकाणी कार थांबविताच ठेकेदाराने बाहेर उडी घेत पळ काढला. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर प्रकार उघडकीस आला. ही घटना बुधवारी (दि.१८) रात्री घडली.
याप्रकरणी गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवून अक्षय ऊर्फ भैया रमेश वाहूळ (२४, रा. बावनघर, सातारा परिसर), कुणाल गौतम जाधव (२६, रा. अयोध्यानगर, एन-७, सिडको) आणि विनोद सुभाष शिंदे (२१, रा. गरमपाणी), अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
फिर्यादी अजित उत्तम जाधव (३३, रा. चाकण रोड, आळंदी, जि. पुणे) यांच्या तक्रारीनुसार, ते एमआयटी कॉलेजच्या लँड स्केपिंगच्या डिझायनिंगचे काम करण्यासाठी आले होते. बुधवारी काम करून ते शिवाजीनगरातील हॉटेलमध्ये जेवायला गेले.
तेथून झाल्टा फाटा येथे त्यांचा मित्र कृष्णा चौधरीला भेटण्यासाठी निघाले. रात्री साडेअकराच्या सुमारास ते कारने (एमएच-४२-एएक्स - ६०९१) जात असताना बीड बायपासवरील नवीन हेडगेवार हॉस्पिटलजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. तेवढ्यात एका दुचाकीने ट्रीपलसीट आरोपी आले. त्यांना चाकूने भोसकण्याची धमकी देत कारमध्ये बसविले.
मागील सीटवर बसलेल्या लुटारूने डोक्याला पिस्तूल लावून गाडी चालवायला सांगितली. त्यानंतर दोन मोबाईल, ३५ हजार रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. त्यातील एक जण अधूनमधून मारहाण करीत होता. त्यांनी १ ग्रॅम सोन्याची बाळीही चाकूने कापून घेतल्याने कानाला जखम झाली.
जाधव यांच्या पत्नीने सासऱ्यां ना हा प्रकार सांगितला. अजित यांच्या वडिलांनी ३० हजार रुपये पाठविले, मात्र क्रांती चौक पोलिसांना माहिती देऊन अजित अडचणीत असल्याचे कळविले. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी जाधव यांच्या मोबाईलवर फोन करून विचारणा केली. तो फोन पोलिसांचा असल्याचे लुटारूंना कळाले. त्यांनी अजित यांना पुन्हा मारहाण केली. कार थांबविताच अजित बाहेर उडी घेऊन पळत सुटले. एका जागी गवतात लपून बसले. काही वेळाने रस्त्यावर येऊन रस्त्यात भेटलेल्या एकाच्या मोबाईलवरून पोलिसांना प्रकार सांगितला.
त्यानंतर एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, प्रवीण पाथरकर, विजय निकम, अशरफ सय्यद, संदीप तायडे, संजय मुळे, विजय भानुसे, मनोहर गिते, कृष्णा गायके, अमोल मुगळे, प्रमोद सुरसे, दत्तात्रय गरड यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून कारसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या टोळीने १८ जूनच्या रात्री बीड बायपासवर अजित जाधव यांच्या अपहरण पूर्वी लघुशंकेसाठी थांबलेले महेश रावसाहेब नरवडे (३४, रा. विश्रांतीनगर, मुकुंदवाडी) आणि शरद वायाळ या दोघा मित्रांनाही मारहाण करून लुटले. त्यांचे दोन मोबाइल, १० हजार रोकड आणि बायोमॅट्रिक मशीन, असा ऐवज लुटला होता. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी अक्षयविरुद्ध ११, कुणालविरुद्ध ७आणि विनोदवर १ गुन्हा दाखल आहे. अक्षयवर ३ वेळा एमपीडीए व १ वेळा हद्दपारीची कारवाई झालेली आहे.
जाधव यांच्याकडील पैसे घेतल्यानंतर लुटारूंनी त्यांच्या पत्नीकडून फोन पे वर पैसे मागायला लावले. पत्नीने ३० हजार पाठविले. लुटारू एटीएमकडे घेऊन गेले. पण तेथून फक्त ४ हजार रुपये निघाले. त्यानंतर दुसऱ्या एटीएमवर जाऊन ही रक्कम काढून घेतली. ६५ हजार रुपये हातात पडल्यानंतरही आरोपींनी पुन्हा पत्नीकडे पैसे मागायला लावले. जाधव यांनी पत्नीला फोन करून पैसे मागितल्यावर पत्नीने फोन पे वरून पैसे जात नसल्याचे सांगितले. त्यावेळी लुटारूंनी मोबाईल हिसकावून पैसे नाही पाठविले तर याला जिवे मारू, अशी धमकी दिली आणि फोन ठेवला.