Thieves stole BSNL's underground wires.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील आंबेडकरनगर भागातील रेणुकामाता मंदिर रोडवरील अंडरग्राऊंड डकमधून बीएसएनएल कंपनीचे तब्बल ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे कॉपर केबल चोरीला गेले. ही घटना १ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.४) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीएसएनएलच्या चिकलठाणा डिव्हिजनचे कनिष्ठ दूरसंचार अधिकारी दत्ता अशोकराव दुबिले (४२, रा. ज्योती प्राईड, सातारा परिसर) यांच्या तक्रारीनुसार शनिवारी (दि.४) सकाळी ६ वाजेच्या सुमारास ते घरी असताना त्यांचे लाईनमन शिवाजी वाघ यांनी त्यांना फोन करून केबल चोरी गेल्याची माहिती दिली.
दुबीले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, हसूल टेलिफोन एक्सचेंज ते आंबेडकरनगर भागातील रेणुका माता मंदिर रोडवरील बीएसएनएलच्या अंडरग्राउंड डकचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या डकमधून अज्ञात चोरट्यांनी ८०० पेअर असलेले, काळ्या रंगाचे २०० मीटर लांबीचे तांब्याचे केबल चोरून नेले.
केबल चोरीच्या पाच घटना
यापूर्वीही शहरात ४ ते ५ ठिकाणी बीएसएनएलचे कॉपर केबल चोरीला गेल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात देण्यात आल्याचे दुबीले यांनी जबाबात नमूद केले आहे. शहरात वारंवार होणाऱ्या या सरकारी केबल चोरीमुळे या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तपास हवालदार भारती गायकवाड करत आहेत.