They arrived in a car with MP registration plates, but their attempt to steal a lawyer's vehicle failed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विद्यानगर परिसरातील दिग्विजय अपार्टमेंटसमोर पार्क केलेल्या वकिलाच्या कारची चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मध्य प्रदेश पासिंगच्या कारमधून आलेल्या दोन चोरट्यांनी ब्रेझा कारची काच फोडून इग्निशन सिस्टीमशी छेडछाड केली. मात्र, वाहन सुरू न झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला. हा प्रकार गुरुवारी (दि. १६) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला.
व्यवसायाने वकील असलेले फिर्यादी संदेश रमण पाटील (४३) यांनी नेहमीप्रमाणे आपली कार (एमएच -०५-बीई-८०२१) पार्किंगमध्ये लावली होती. पहाटे बलेनो कारमधून (एमपी-०३-झेडडी-१६५४) दोन अज्ञात चोरटे तिथे आले.
त्यांनी पाटील यांच्या कारच्या डाव्या बाजूच्या मागील दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला आणि वायरशी छेडछाड करत गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपयश आल्याने त्यांनी पळ काढला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहेत.