जलसंधारणाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला केली जातीवाचक शिवीगाळ; प्रतिगाडी १० हजार रुपये देण्याचीही मागणी
case register
Case registered
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : भाड्याने लावलेल्या गाड्यांचे बिल आणि नवीन आदेशाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण व सिंचन विभागाचे उपअभियंता (प्रभारी कार्यकारी अभियंता) कपिल बिडगर यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत मंगळवारी (दि. २१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विलास सखाराम गोरे (३९, रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचा व्यवसाय असून, त्यांनी २०२३ मध्ये ई-निविदेच्या माध्यमातून जिल्हा जलसंधारण विभाग (ल.पा.), दिल्ली गेट येथे तीन गाड्या भाड्याने दिल्या होत्या. या ई-निविदेची मुदत १० ऑक्टोबर २०२५ रोजी संपुष्टात आली होती. गाड्यांचा करार संपल्यानंतर त्या पुन्हा सुरू ठेवण्याबाबत गोरे यांनी अधिकारी कपिल बिडगर यांना विचारणा केली असता, बिडगर यांनी प्रतिगाडी १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. गोरे यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली होती.

कार्यालयात अपमान आणि धमकी

१२ जानेवारी रोजी गोरे हे त्यांच्या गाड्यांच्या बिलांबाबत आणि नवीन टेंडरच्या आदेशाबाबत माहिती घेण्यासाठी जलसंधारण विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी बिडगर यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि गेट आऊट म्हणत कार्यालयाबाहेर काढले. तसेच, जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. यापुढे तुझ्या गाड्या कोणत्याच कार्यालयामध्ये दिसू देणार नाही. तू कार्यालयाच्या बाहेर गेला नाहीस तर, तू सरकारी कामामध्ये अडथळा आणून अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करेल, अशी धमकीही बिडगर यांनी दिली.

जि.प. सीईओंच्या सूचनेवरून तक्रार

या प्रकारानंतर व्यथित झालेल्या विलास गोरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी घडल्याप्रकाराबाबत तक्रार देण्यास सांगितले. अखेर मंगळवारी (दि. २१) गोरे यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात कपिल बिडगर यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news