There is a mess in tree plantation on the Khultabad-Mhaismal road too
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाने फुलंब्रीप्रमाणेच खुलाताबाद तालुक्यातही कागदावरच वृक्षारोपण केले आहे. प्रशासनाकडून खुलताबाद-म्हैसमाळ रस्त्यावर २०२४ साली २ हजार झाडे लावण्यात आल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात या मार्गावर सहाशेही झाडेही लावण्यात आली नाहीत. तसेच लावलेल्या झाडांपैकी तब्बल साडेतीनशे अधिक झाडे जळून गेल्याने पाईपच उभे आहेत.
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन डिव्हिजनमध्ये २०२४-२५ वर्षात १२ कोटींचे वृक्षारोपण केले आहे. यात लावण्यात आलेल्या झाडांचे तीन वर्षे संगोपन करणे बंधनकारक आहे. पंरतु अधिकाऱ्यांच्याच दुर्लक्षामुळे आणि वरिष्ठांच्या मर्जीतील कंत्राटदार नियुक्त केल्याने निविदाप्रक्रियेपासून तर कंत्राटदार एजन्सी अंतिम करेपर्यंत मोठ्याप्रमाणात अनियमितता झाली आहे.
एवढेच नव्हे तर वृक्षारोपणाचे कामही बोगस झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात कंत्राटदार तेजस एजन्सीने वर्षभरापूर्वीच वृक्षारोपण केले, परंतु जेथे १ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते, तेथे केवळ ३०० ते ३५० झाडेच लावली अन् जेथे दीड हजार झाडांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्या रस्त्यावर अथवा शासकीय कार्यालय परिसरात केवळ ६०० ते सातशे झाडे लावून कंत्राटदार पुन्हा त्या ठिकाणी फिरकलेच नाही.
फुलंब्रीतील चारही रस्त्यांवर असाच प्रकार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. त्यापाठोपाठ खुलताबादेतही असाच प्रकार झाला आहे. या ठिकाणीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाअंतर्गत तेजस एजन्सीने दीड वर्षापूर्वी सुमारे तीन हजार रोपे लावण्यात आली. त्यासाठीही कंत्राटदाराने फुलंब्रीसारखेच पाच फुटांचा पाईप व त्यात तेवढ्याच उंचीचे रोप जमिनीत रोवून लावण्यात आले.
जनावरे खाऊ नये यासाठी पाईप पद्धत अवलंबण्यात आली. परंतु वृक्षारोपणानंतर झाडाला दोन दिवस पाणी देऊन कंत्राटदार गेला तो बिल घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात अवतरला. त्यामुळे जेवढी झाले लावण्यात आली, त्यापैकी केवळ २० टक्केच झाडे जगली. असे असतानाही कंत्राटदाराची देयके अदा करण्यात आली आहेत.
३ वर्षांचे काम तरीही देयके अदा
वृक्षारोपण आणि संगोपन हे काम तीन वर्षांसाठी एजन्सीला दिले आहे, परंतु असे असतानाही एजन्सीने वृक्षारोपण किती केले व किती झाडे जगविली, जळालेल्या झाडांच्या ठिकाणी पुन्हा नव्याने वृक्षारोपण केले का, नसेल तर देयके अदा कशी केली, असे सवाल उपस्थित होत आहेत.
तेजस' ने जिल्ह्याभरात लावली तेजस सुपर स्ट्रक्चर प्रा. लि. या एजन्सीला खुलतबादेतील वृक्षारोपण व संगोपनाचे काम दिले आहे. २ वर्षांपूर्वी वृक्षारोपण केले असून, त्यांनी किती झाले लावली, त्यांची सद्यस्थिती याबाबतची माहिती कनिष्ठ अभियंत्यांकडे असेल. या कामाचे देयकेही अदा झाले आहेत.- दिलीप कोलते, विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग