The Zilla Parishad election campaign begins today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान आपघातात मृत्यूची दुर्दैवी घटना घडली. यानंतर दोन दिवस जिल्ह्यात सर्वच पक्षांकडून प्रचार थांबविण्यात आला होता. मात्र, शनिवारपासून जिल्ह्यात पुन्हा प्रचाराचा धुराळा उडणार असून सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक आणि प्रदेशस्तरीय नेत्यांच्या सभा, बैठका होणार आहेत. भाजपचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आज (दि. ३१) तर सोमवार, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत.
महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरला आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आणि एमआयएम, वंचितने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही नंबर वन राहण्यासाठी भाजपने जिल्ह्यात प्रचाराचा जोर वाढविला आहे. ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते यासह नवनिर्वाचित नगरसेवकही प्रचारात जुंपले आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर भाजपचे मंत्री सावे, कराड शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी विविध तालुक्यांमध्ये छोटेखानी सभा घेतल्या आहेत. तर आज जिल्ह्यात चार ठिकाणी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा होत आहेत. जिल्ह्यात पैठण, वैजापूर, कन्नड आणि सिल्लोड हे मतदार संघ शिंदेसेनेकडे आहे. त्यामुळे या चारही मतदार संघात सेनेने आपल्या आमदारांवरच जबाबदारी सोपविली आहे. त्यासोबतच प्रत्येकांच्या सभा, बैठका तालुक्यांमध्ये होत आहे.
ऐनवेळी युती तुटल्याने भाजप-शिवसेनेने एकमेकांविरोधात प्रचाराची रणनिती आखली आहे. त्यासोबतच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची देखील जिल्ह्यात सभा होणार आहे. उबाठाचे चार नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्यात सुषमा अंधारे, खासदार ओम राजे निंबाळकर, शरद कोळी, नितीन बानगुडे पाटील यांचा समोवश आहे. एमआयएमने पाच गट आणि १६ गणासाठी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यास सभा होणार आहेत.
फडणवीस, शिंदे यांच्या सभा
जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून प्रचार संभांचा धुराळा उडणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे, मंत्री पंकजा मुंडे, तर शिवसेनेचे एकमेव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच सभा होणार आहे.
प्रचाराला कमी कालावधी
जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा प्रचारासाठी केवळ एक आठवड्याचा कालावधी दिला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनला नेत्यांच्या सभांचे नियोजन करतांना अडचणी येत आहेत. अजूनही काही नेत्यांच्या सभांच्या तारखा निश्चित झाल्या नसल्याचे राजकीय पक्षांकडून सांगण्यात येत आहे.