

sambhajinagar In a month, 21 tolas of gold were stolen in 12 incidents
प्रमोद अडसुळे छत्रपती संभाजीनगर : स्पोर्ट बाईकस्वार मंगळसूत्र चोरांनी परिमंडळ दोनमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला असून, महिनाभरात जवाहरनगर, उस्मानपुरा, मुकुंदवाडी, एम सिडको, सातारा हद्दीमध्ये १२ ठिकाणी चेन स्नॅचिंग करून सुमारे २१ तोळे सोने ओरबाडून नेत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.
विशेष म्हणजे यातील एकाही चोरट्याला पोलिस पकडू शकले नाही. दरम्यान, जवाहरनगर हद्दीतील शिव-ाजीनगर भागात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महिलेचे अडीच तोळ्यांचे गंठण स्पोर्ट बाईकस्वार दोघांनी हिसकावले.
त्यानंतर दोन तासांतच याच दोघांनी मुकुंदवाडी भागात महिलेचे बेन्टेक्सचे मंगळसूत्र ओढले. मात्र कार चालकाने पाठलाग करत अडवताच दुचाकी सोडून चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे, सोन्याचे दर प्रतितोळा दोन लाख रुपयांच्या घरात गेल्याने चोरटे अधिक सक्रिय झाले आहेत.
दुसरीकडे स्थानिक पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथके (डीबी) केवळ अर्थपूर्ण कामगिरी करण्यात गुंतलेल्या आहेत. स्ट्रीट क्राईम, चेन स्नॅचिंग, घरफोड्या, चोरीच्या घटना उघड करण्यात या पथकांना काडीचा इंटरेस्ट नसल्याचे दिसते. या पथकांमधील कुचकामी अधिकारी-कर्मचाऱ्यांची उचलबांगडी झाली पाहिजे, अशी जोरदार चर्चा पोलिस दलातच सुरू आहे. भामट्यांनी कुठे, कधी आणि कसे ओरबाडले सोने ६ जानेवारी (एम सिडको) चतुर्थीनिमित्त सिडको एन-१ भागातील काळा गणपती मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या राजश्री सुरडकर यांचे ४ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लंपास केले ही घटना मंगळवारी ६ जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
१२ जानेवारी रोजी ३ घटना (उस्मानपुरा व सातारा) उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीतील ज्योतीनगरात अवघ्या १० मिनिटांच्या अंतराने प्रियांका सोमाणी आणि सुनंदा देवकर या दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडले. या घटना सायंकाळी ७:१० वाजेच्या सुमारास घडल्या.
सातारा पोलिसांच्या हद्दीत गॅदरिंगचा कार्यक्रम संपल्यानंतर मुलांना घेऊन घरी परतणाऱ्या अश्विनी पहाड यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावले. ही घटना सोमवारी (दि.१२) रात्री ८.५० वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदानाजवळ घडली.
१६ जानेवारी (उस्मानपुरा व एम सिडको) गरवारे समोरून तिघांच्या तर अभियांत्रिकी समोर एकाची अशा चौघांच्या ५.७ तोळ्यांच्या सोनसाखळ्या चोरट्याने लंपास केल्या. एमआयडीसी सिडको आणि उस्मानपुरा हद्दीत या घटना घडल्या.
१७ जानेवारी (सातारा)
कुटुंबीयांसोबत हॉटेलमधून जेवण करून घराकडे निघालेल्या जयश्री नायर यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी (दि.१७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील एका हॉटेल समोर घडली.
२५ जानेवारी (सातारा)
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाहून मैत्रिणीसोबत मोपेडने घराकडे निघालेल्या अर्चना शुक्ला यांच्या गळ्यातील ४.५ तोळ्यांचे सोन्याचे गंठण (बाजारमूल्य सुमारे ७ लाख रुपये) दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी हिसकावले. ही घटना २५ जानेवारीला रात्री ९:२० वाजेच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावरील बेंबडे हॉस्पिटलच्या बाजूला घडली.
२७ जानेवारी (मुकुंदवाडी)
मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत मुलींना शाळेतून घराकडे घेऊन निघालेल्या अनिता कोरडे यांच्या गळ्यातील ७ ग्रॅमचे मंगळसूत्र स्पोर्ट बाईकस्वार दोन चोरट्यांनी हिसकावले. ही घटना मंगळवारी २७ जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तोरणगड, रामनगर येथे घडली.
पहिली घटना : शिवाजीनगरात २.५ तोळ्यांचे गंठण हिसकावले
पहिली घटना शिवाजीनगर येथील इंदिरानगर रोडवर गुरुवारी (दि. २९) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. विजयश्री विठ्ठल तेललवार (५५) या दूध आणि किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. साई श्रद्धा हॉटेलजवळ मागून आलेल्या विशीतील दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे मिनी गंठण हिसकावून नेले.
शिवाजीनगर पोलिस चौकीतून असहकार्य विशेष म्हणजे शिवाजीनगर पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असताना घटना घडली. महिला चौकीत गेल्याही मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी साधे घटनास्थळापर्यंत जाण्याचीही तसदी घेतली नाही. उलट फिर्यादींनाच जवाहरनगर पोलिस ठाण्याचा रस्ता दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकीतील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली असती तर चोरटे दुसरीकडे नाकाबंदीत हाती लागले असते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.