Chhatrapati Sambhajinagar : महिला उपकुलसचिवांनी डोक्यावर वाहिले कार्यालयीन दप्तर  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : महिला उपकुलसचिवांनी डोक्यावर वाहिले कार्यालयीन दप्तर

मागणी करूनही शिपाई मिळत नसल्याची उपकुलसचिवांची तक्रार

पुढारी वृत्तसेवा

The women deputy Registrar carried the office briefcase on her head

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झाल्यानंतर विनंती करूनही महिला कुलसचिवांना विद्यापीठ प्रशासनाने शिपाई उपलब्ध करून न दिल्याने वैतागलेल्या उपकुलसचिवांनी मंगळवारी (दि. २४) कार्यालयीन दप्तर डोक्यावर वाहत दुसरे दालन गाठले. महिला अधिकारी कार्यालयीन दप्तर डोक्यावर नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठात चर्चेचा विषय बनला आहे.

हेमलता गुलाबराव ठाकरे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव पदावर कार्यरत आहेत. त्या परीक्षा व मूल्यमापन विभागात कार्यरत होत्या. परीक्षा व मूल्यमापन विभागातून त्यांची बदली १९ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य प्रशासकीय इमारतीतील पदव्युत्तर विभागात करण्यात आली.तेथून अवघ्या तीन महिन्यांच्या आतच ३ एप्रिल २०२५ रोजी त्यांची बदली मुख्य प्रशासकीय इमारतीतीलच अभ्यासक्रम विभागाच्या उपकुलसचिवपदी करण्यात आली.

दरम्यान, परीक्षा विभागाचे दालन रिकामे करण्यासाठी मागणी करूनही प्रशासनाने शिपाई उपलब्ध करून दिला नाही. तसेच त्यांना हे दालन २५ जूनपर्यंत खाली करण्याचे आदेशही देण्यात आले होते. शिपाई मिळत नसल्याने त्यांनी स्वतःच त्यांचे दप्तर डोक्यावर घेत अभ्यासक्रम विभागाचे कार्यालय गाठले. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या या भूमिकेबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.

बदनाम करण्याचा प्रयत्न

उपकुलसचिवांना शिपायासह पूर्ण कार्यालयीन स्टाप दिमतीला असतो. त्यामुळे त्यांना शिपाई देण्याचा प्रश्नच येत नाही. दरम्यान व्हिडिओ व्हायलर करून त्यांनी विद्यापीठाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला
-डॉ. प्रशांत अमृतकर, प्र. कुलसचिव

अनेकदा विनंती अर्ज केले

माझी बदली होण्याआधीही शिपाई दिला नव्हता. आता बदली झाल्यानंतर मी कार्यालयीन दप्तर हलवण्यासाठी शिपाई मिळावी यासाठी अनेकदा विनंती अर्ज केले. यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने आणि वरतून २५ जूनच्या आत कार्यालय खाली करण्याचे आदेश दिल्याने मला स्वतःच डोक्यावर दप्तर वाहावे लागले. हेमलता ठाकरे, उपकुलसचिव अभ्यासक्रम विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT