The water level of Harsul Lake is at 22 feet
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : पावसाचे अडीच महिने पूर्ण होत आले असतानाही अद्याप शहराच्या ११ वॉडांना पाणीपुरवठा करणाऱ्या हसूल तलावाची पाणी पातळी २२ फुटांवरच आहे. हा तलाव ओव्हरफ्लो होण्यासाठी अजूनही ६ फूट पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यंदा तलाव तुडुंब भरण्यासाठी सप्टेंबरमध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शहरातील ११ वॉर्डातील नागरिकांची तहान भागविणाऱ्या हर्सल तलावाची जल साठवण क्षमता ही २८ फूट एवढी आहे. गतवर्षी जोरदार पाऊस झाल्याने हा तलाव तुडुंब भरला होता. तलावाच्या सांडण्यातून पाणी ओव्हरफ्लो झाले होते. यंदाही तलाव भरेल, अशी शक्यता होती.
परंतु ऑगस्ट संपूनही अद्याप तलावाची पाणीपातळी ही २२ फुटांवरच आहे. या तलावातून दररोज दहा एमएलडी पाण्याचा उपसा करून नागरिकांना पिण्यासाठी वितरित केले जाते. यंदा तलाव भरला नाही तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता आहे. डिसेंबरमध्ये जायकवाडीतून नव्या पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित होऊन त्यातून शहरात २०० एमएलडी पाण्याची आवक झाली, तर शहराला हर्मूलच्या पाण्याची गरज पडणार नाही.