

Female police rally drug smuggling gang
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गुजरात येथील कंपनीकडून ट्रॅव्हल्सद्वारे नशेसाठी सिरप, बटन गोळ्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींची पोलिस निरीक्षक गीता बागवडे, दामिनी पथक व महिला पोलिसांनी हत्तीसिंगपुरा, कटकटगेट, बायजीपुऱ्यातून सोमवारी (दि.१) सायंकाळी धिंड काढली. आरोपींना यथेच्छ प्रसाद देण्यात आल्याने चालताना पाय अडखळत होते. मान खाली आणि हात जोडून आरोपी चालत होते. नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
मुख्य पुरवठादार इरफान घोरवडे (रा. नांदेड), सय्यद नजिरोद्दीन सय्यद रियाजोद्दीन (३३, रा. बाबर कॉलनी, हत्तीसिंगपुरा) आणि अमजद खान अन्वर खान (३०, रा. इकबालनगर, नांदेड) या आरोपींचा यात समावेश आहे. एनडीपीएस, गुन्हे शाखा यासह दामिनी पथकातील अधिकारी, महिला अंमलदार यांनी आरोपींची धिंड काढल्याने शहरात चांगलीच चर्चा झाली. यापुढे तरुणाईला नशेच्या दलदलीत लोटणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे. नागरिकांनीही अमली पदार्थ विक्रेत्यांची नावे असतील तर पोलिसांना द्यावीत. नावे देणार्याचे नाव गोपनीय ठेवू, असे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी आवाहन केले.
दरम्यान, एनडीपीएसच्या पथकाने टीव्हीसेंटर भागातील पोलिस कॉलनीच्या पाठीमागे नाल्याजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारून आरोपींना ड्रग्स, बटन गोळ्या, सिरपसह अटक केले होते. त्यानंतर इरफानने गुजरातच्या अहमदाबाद येथून मागविले पार्सल गुरुवारी न्यू पंजाब ट्रॅव्हल्सच्या बसमधून जप्त केले. त्यात १२७० सिरपच्या बाटल्यांचे पार्सल होते. इरफान कंपनीतून अधिकृत माल घेऊन बाहेर नशेसाठी पेडलर्सना विक्री करत असलयाचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे यांचे पथक नांदेड येथे जाऊन आले. मात्र तिथे इरफानने कोणतेही रेकॉर्ड ठेवेलेले नव्हते. माल मागवून तो पेडलर्सला तसाच विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
तरुणाईला नशेच्या आहारी घालणाऱ्या आरोपींवर कारवाईसाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी एनडीपीएस पथक स्थापन केले. पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्याकडे जबाबदारी दिली. त्यानंतर नशेखोरांवर कारवाईला वेग आला. प्रारंभी माऊली यादव, आदिल चाऊस टोळी, नंतर अजय ठाकूर अन् सिरप, बटनचा गोरखधंदा करणाऱ्या फैजल तेजा अशा तीन टोळ्यांवर मकोका अंर्तगत कारवाई केली. टोळ्या उद्भवस्त झाल्या तरी पेडलर्सला रोखण्याचे आव्हान आहेच.
कुख्यात तेजा बटन, सिरपचा धंदा करत होता. त्याला पोलिस आयुक्तांनी चांगलाच दणका देत मकोकाअंर्तगत जेलमध्ये टाकले. तेजाची मध्यप्रदेशहून तस्करीची चेन पोलिसांनी तोडली. मात्र गेल्या काही महिन्यात रेकॉर्डवरील आरोपी नाजिरोद्दीन सक्रिय झाला. त्याला इरफानची लिंक लागल्याने मोठ्याप्रमाणात माल मागवून तिघांना सिरप, बटन गोळ्यांची विक्रीसाठी नेटवर्क सुरू केले.
इरफान घोरवडे कंपनीतून माल मागवून थेट पेडलर्सला विक्री करत होता. पुरवठादाराचा परवाना असल्याने त्याने कंपन्यांकडून औषधी घेऊन कोणाला किती माल विक्री केला? याची तपासणी अन्न व औषधी प्रशासनाने केली का? हा प्रश्न अनुउत्तरित आहे. दरम्यान, या टोळीतील पेडलर्सचा शोध घेतला जात आहे. तसेच इरफानने ऑनलाईन काही विक्री केले का हेही तपासले जात आहे.