प्रचारासाठी सभास्थळाची एकाच पक्षाला दीर्घकाळ परवानगी देऊ नये ! File Photo
छत्रपती संभाजीनगर

प्रचारासाठी सभास्थळाची एकाच पक्षाला दीर्घकाळ परवानगी देऊ नये !

मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचे निर्देश : रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

The venue for election rallies should not be given to a single party for an extended period!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला शहरातील एकच मैदान, सभागृह किवा सभास्थळ सलग आठ ते दहा दिवस आरक्षित ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक व निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी शनिवारी (दि. २७) प्रशासन व कर्मचाऱ्यांना दिले.

निवडणूकपूर्व तयारीचा त्यांनी सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रथम अर्ज करणाऱ्या पक्षास किंवा उमेदवारास प्राधान्य देण्याचे आदेशही दिले असून निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने जे अधिकारी व कर्मचारी अद्याप कामावर रुजू झालेले नाहीत, त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर केला असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने शनिवारी आयोजित बैठकीत निवडणूक नियोजन, प्रचार व्यवस्थापन, मनुष्यबळ, प्रशिक्षण तसेच आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी शासकीय, निमशासकीय व खासगी मैदान, सभागृह तसेच इतर सार्वजनिक स्थळे कोणत्याही एका पक्षाच्या ताब्यात दीर्घकाळ राहणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक व निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच एखाद्या स्थळासाठी एकाच वेळी दोन किंवा अधिक पक्षांचे अर्ज आल्यास, प्रथम अर्ज दाखल केलेल्या पक्षास किंवा उमेदवारास प्राधान्य देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

दरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व तांत्रिक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येकी नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधील उपलब्ध सोयी-सुविधांचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेण्यात आला. उद्या होणाऱ्या मतदान केंद्रप्रमुख व मतदान कर्मचा-यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत प्रशिक्षण दर्जेदार व प्रभावी असणे आवश्यक असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील जवाबदाऱ्या, नियमावली यासह आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धती यांची सुस्पष्ट माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT