

8,000 polling officers and staff for the municipal elections will receive training today.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून त्यासंदर्भातील तयारीला वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया सुरळीत व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नियुक्त तब्बल ८ हजार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण रविवारी (दि. २८) आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये होणार असून यात ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसह आपत्कालीन व्यवस्थापन हातळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर ही निवडणूक पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार शहरातील २९ प्रभागांतील ११५ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, ही प्रक्रिया सुरळीत व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणातून सज्ज केले जाणार आहे.
हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये होणार असून सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ८ यांच्या अखत्यारितील प्रत्येकी १ हजार याप्रमाणे एकूण ८ हजार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (रेल्वे स्टेशन रोड), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ( उस्मानपुरा), एमआयटी कॉलेज (बीड बायपास), मुख्य नाट्यगृह तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विविध ठिकाणी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यांची हाताळणी, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, मतदानाच्या दिवशी घ्यावयाची दक्षता तसेच आपत्कालीन परिस्थितीत अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. निर्भय, पारदर्शक आणि शांत वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले असून, या प्रशिक्षणामुळे संभाव्य त्रुटी टाळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.