The university will focus on quality and infrastructure over the next two years: Vice-Chancellor
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन वर्षांत विद्यापीठ निधी तसेच पीएम उषा प्रकल्पांतर्गत सुमारे ७७कोटींच्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित गुणवत्ता व दर्जेदार संशोधनावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केले.
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी २४ जानेवारी २०२४ रोजी कुलगुरुपदाची सूत्रे घेतली. द्विवर्षपूर्तीनिमित्त कुलगुरू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.बी.एन. डोळे, डॉ. संजय शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. फुलारी यांनी गेल्या दोन वर्षांत झालेल्या विकासकामांची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांत विद्यापीठ निधीतून तसेच पीएम उषा प्रकल्पांतर्गत एकूण ७७ कोटी ४० लाख रुपयांची पायाभूत विकासकामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती दिली.
विद्यापीठात अनेक कामे केली! प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात पीएम उषा प्रकल्पांतर्गत १०० कोटींचा निधी फेब्रुवारी महिन्यात मंजूर झाला. शैक्षणिक व पायाभूत सुविधा यातून मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. तसेच याच काळात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनास राज्यशासनातर्फे तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
जूनमध्ये पार पडलेल्या ६४ व्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठाने पुढील वर्षात टॉप ५० मध्ये स्थान मिळवावे अशी अपेक्षा तत्कालीन कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केली होती. तीन महिन्यांच्या आतच विद्यापीठाने एनआयआरएफ अर्थात नॅशनल रैंकिंग फेम वर्क अंतर्गत ऑगस्ट महिन्यात टॉप-५० राज्य विद्यापीठात स्थान मिळविले.