The thief expressed his plight through a note; three burglaries occurred in Vaijapur in a single night
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून वैजापूर शहरात चोऱ्यांचे सत्र वाढले असून, या भामट्यांनी दुचाकी चोऱ्यानंतर आता बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राना आपले लक्ष्य केले आहे. शनिवारी रात्री चोरट्यांनी शहरातील म्हसोबा चौक येथील व जुन्या बसस्थानक परिसरातील स्वस्तिक टॉवरमधील बँक ऑफ बडोद्याचे दोन ग्राहक सेवा केंद्र फोडून रोख रक्कम पळवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एका ठिकाणी चोरी केल्यानंतर चोरट्याने चिठ्ठी लिहून ठेवली. पोलिसांनी हप्ते घेणे बंद करा सर्व सुरळीत होईल, असे लिहून आपली व्यथा मांडली.
म्हसोबा चौक येथील ग्राहक सेवा केंद्रातून शटर तोडून रोख रुपये ३८ हजार रुपये चोरी झाल्याची तक्रार केंद्राचे मालक भगवान दरेकर (रा. आंनदनगर) यांनी पोलिसांत केली आहे. तर स्वस्तिक टॉवरमधील जिल्हा बँकेत कार्यरत असलेले सेक्रेटरी संजय ढोले यांच्या बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्रातून तीस हजार रुपये चोरी झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय संतोषीमातानगर, फुलेवाडी रोड येथील सविता गायकवाड यांच्याकडेही चोरी झाल्याचे समोर आले आहे.
शहरातील सर्व भागात शनिवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. चोरीच्या घटनेनंतर वैजापूरचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, महेश झाल्टे, कांबळे आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) येथून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तथापि, चोरट्यांचा माग लागू शकला नाही. फिंगर प्रिंट तज्ज्ञही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
चोरीपेक्षा भयंकर चिठ्ठी !
ठक्कर बाजार परिसरातील ढोले यांच्या ग्राहक सेवा केंद्रात चोरी झाली, पण त्या चोरीनंतर चोरट्याने मागे ठेवलेली एक चिठ्ठी मात्र संपूर्ण यंत्रणेला आरसा दाखवून गेली. त्या कागदावर लिहिले होते पोलिसांनो, हप्ते घेणे बंद करा. ही एक ओळ म्हणजे केवळ चोराची मग्रुरी नाही, तर व्यवस्थेवर टाकलेला थेट आरोप आहे. चोर म्हणतोय की, तो फक्त चोरी करत नाही तो व्यवस्थेच्या हप्तेखोरीच्या सावलीत काम करतोय. म्हणजेच गुन्हेगारी आणि यंत्रणा यांच्यात कुठेतरी एक अदृश्य साखळी तयार झाली आहे, असा सूचक इशारा चोरट्याने दिला आहे.