The stolen two-wheeler was used until the petrol was exhausted
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महिनाभरापूर्वी चोरीच्या दुचाकीसह अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराने जेलमधून बाहेर पडताच पुन्हा पाच दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. सीसीटीव्हीत कैद होताच सिटी चौक पोलिसांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकून ५ दुचाकी हस्तगत केल्या. अनिस खान बाबा खलील खान (रा. सईदा कॉलनी, हर्सल) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनिस हा काळा दरवाजा भागात चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, सहायक फौजदार मुनीर पठाण, जमादार राजेंद्र साळुंके, बबन इप्पर, आनंद वाहूळ, मनोहर त्रिभुवन, पवार, घुगे, पाडवी यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याने शहागंज येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने अन्य चार दुचाकी देखील चोरी करून आडबाजूला रस्त्यात सोडून दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या.
अनिस दुकाने फोडून बॅटरी, टायर, रोख रक्कम, साहित्य चोरी करण्यात सराईत आहे. नशापाणी करण्यासाठी चोऱ्यामाऱ्या करत असल्याचे तपासात समोर आले. काही दिवसांपूर्वीच उत्तम मिठाई दुकानात चोरी करताना त्याचा साथीदार सापडला होता तेव्हा अनिस पळून गेला होता. दरम्यान, अनिसकडे मास्टर की असल्याने कोणतीही दुचाकी काही सेकंदात चोरी करतो. एकवेळा दुचाकी विकायला गेला तेव्हा कागदपत्रे नसल्याने अवघ्या पाचशे रुपयांत समोरच्याने दुचाकी मागितली. त्यामुळे विक्री पेक्षा फिरण्यासाठी म्हणून तो दुचाकी चोरी करू लागला. छोट्या-मोठ्या चोऱ्या करण्यासाठी तो दुचाकी वापरत होता. नंबर प्लेट न बदलता दुचाकी पेट्रोल संपेपर्यंत वापरून सोडून द्यायचा.
अनिसविरुद्ध २० पेक्षा अधिक गुन्हे
अनिस हा सराईत चोरटा असून, फेब्रुवारीत गुन्हे शाखेने त्याला सिडको, हर्मूल, चिकलठाणा येथील तीन दुकाने फोडून साहित्य चोरी प्रकरणी अटक केली होती. तेव्हा त्याच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात ९, बेगमपुरा २, सिडको ४, जवाहरनगर, क्रांती चौक, मुकुंदवाडी आणि हसूल पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे तब्बल २० पेक्षा अधिक दुकान फोडी, लूटमार, घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले होते.