The Shivshahi bus will provide service in the form of Hirkani
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अपघातग्रस्त किंवा आगीच्या घटनेत जळालेल्या शिवशाही बसच्या चेसिसवर तसेच वयोमान संपलेल्या शिवशाही बसचे रूपांतर हिरकणीत करण्याचे काम मुख्य कार्यशाळेत सुरू आहे. ५१ शिवशाही बसचे हिरकणीत रूपांतर करण्याचे उद्दिष्ट असून, सात हिरकणी बस अंतिम टप्प्यात आल्या आहेत. रूपांतरित झालेल्या हिरकणी बस प्रवाशांना सेवेत लवकरच दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
शिवशाही बसचे आगमन होताच प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला होता. वातानुकूलित सेवा तसेच आरामदायी प्रवासासाठी शिवशाही प्रसिद्ध होती. शिवशाही प्रवाशांना सेवा देत देत अनेक संकटांना सामोरी गेली. अनेक गाड्या अपघातग्रस्त झाल्या तर काही अपघातानंतर जळालेल्या अवस्थेत होत्या. या बसच्या चेसिसवर हिरकणी बस बांधण्यात येणार आहेत. तसेच काही शिवशाही सेवेतून रिटायर करण्यात आल्या आहेत. या बसचे रूपांतर हिरकणीत करण्याचे काम सुरू.
५१ बसचे उद्दिष्ट
मुख्य कार्यशाळेत ५१ शिवशाही बस हिरकणीत रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. या कार्यशाळेत ठाणे, नागपूर, पुणे, अहिल्यानगर व इतर ठिकाणांहून सेवानिवृत्त झालेल्या शिवशाही दाखल झाल्या आहेत. त्या बस हिरकणीत रूपांतरित होत आहेत. सध्या जुन्या चेसिसवर बस बांधणी आणि शिवशाहीचे हिकरणीत रूपांतर करणे एवढेच काम कार्यशाळेत सुरू आहे.
सात बस अंतिम टप्प्यात
कार्यशाळेत जुन्या शिवशाही बस हिरकणीत रूपांतरित केलेल्या दोन बस विविध मार्गांवर सेवा देत आहेत. आजघडीला सात बसचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या पूर्ण होताच प्रवासी सेवेसाठी पाठवण्यात येणार आहेत. उर्वरित बसचे काम पूर्ण होताच मागणीच्या ठिकाणी रवाना करण्यात येणार आहेत, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली. मुकुंदवाडी येथील एसटीच्या मुख्य कार्यशाळेत आहे. सुमारे सात बसचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.