

पैठण: पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पाण्यात सात दिवसांपूर्वी एक खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच सोमवार दि.२२ रोजी सायंकाळी अर्धवट धड असलेले कुजलेला अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार "आत्महत्याचा आहे का घातपात" यासंदर्भात पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अधिक माहिती पैठण शहरापासून जवळच असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीत सात दिवसापूर्वी गदेवाडी ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील मूकबधिर व्यक्तीचा खून करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हातपाय बांधलेल्या अवस्थेत पोत्यामध्ये आणून या नदीच्या पाण्यात टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली.
आता सोमवार रोजी सायंकाळी या नदीत मासेमारी व खेकडे पकडणाऱ्या काही तरुणाला पाटेगाव येथील गोदावरी पुलापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या कडेला अर्धवट धड असलेल्या कुजलेला मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचा प्रकार निदर्शनास आला.
सदरील तरुणाने पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना याबाबत खबर दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक महादेव गोमारे,सपोनि सी.पी पवार, पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे, हवालदार रावसाहेब आव्हाड, नरेंद्र अंधारे, राजेश आटोळे, गायकवाड या पोलीस पथकाने घटनास्थळ जाऊन पाहणी करून पंचनामा केला.
सदरील मयत व्यक्तीच्या कमरा खालचा भाग पूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अंगामध्ये निळसर रंगाची पॅन्ट असून या अनोळखी व्यक्तीबाबत परिसरात ओळख पटविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या व्यक्तीचा मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. हा प्रकार आत्महत्या का घातपात आहे या संदर्भात पैठण पोलीसांनी तपास सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली आहे.