The plan was to siphon off 650 crore rupees from land belonging to a deity
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जाधववाडी मोंढ्यातील सनी सेंटरमागे असलेल्या श्री राम मंदिर बालाजी मंठच्या मालकीची गट नंबर १२४ आणि १२५ मध्ये अनुक्रमे २० आणि २१ एकर जमीन आहे. या वर्ग २ च्या खिदमत मास जागेवरील तब्बल ८१० प्लॉटची अवैध प्लॉटिंग निष्कासित करून महापालिकेने रामानंद बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या मुकुंद कुलकर्णी यांचा ६५० कोटी रुपयांचा मलिदा लाटण्याचा डाव हाणून पाडला आहे. ही कारवाई होईपर्यंत लहान-मोठ्या आकाराच्या ८० ते ९० प्लॉट्सचा इसार घेतला असून विशेष म्हणजे ८५ लाख ते दीड कोटी असे प्लॉट्सचे दर आहेत.
जिल्ह्यात सध्या देवाच्या जमिनी ट्रस्ट आणि विश्वस्तांकडून विक्री करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील महायुतीचे सरकार येत्या हिवाळी अधिवेशनात खिदमत मास आणि मदतमास या जमिनींबाबत नवा कायदा आणण्यात येईल. त्यात या जमिनी विक्री करणे आणखीच कठीण होणार असल्याचे संकेत २ ऑक्टोबरला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना स्पष्ट केले आहे.
तसेच ज्यांनी या जमिनींमध्ये बदमाशी केली आहे, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी एसआयटी नियुक्त करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यात जाधववाडी मोंढा परिसरातील श्री राम मंदिर मठ बालाजी ट्रस्टच्या खिदमतमास जमिनीचा देखील आता समावेश होणार आहे. मंदिर ट्रस्ट १९९१-९२ सालापासून ही मोक्याची जागा विक्री करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
वर्ष २०२० ते २०२५ या पाच वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात हालचाली झाल्या. त्यात ट्रस्टच्या दोन पदाधिकाऱ्यांनी एनएच्या एनओसीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पत्र व्यवहार केले. तर मुकुंद कुलकर्णी यांनी रामानंद बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या नावाने या जागेत सेल्फ डेव्हलमेंटच्या नावाखाली प्लॉटिंगचा धडाका सुरू केला.
यात काही मोठे तर काही लहान आकाराचे प्लॉट काढण्यात आले. पहिल्यांदा २१ एकरामध्येच प्लॉटिंग करण्यात आल्याची माहिती खुद्द मुकुंद कुलकर्णी यांनीच दिली. तसेच यामध्ये ट्रस्टच्या दोन पदाधिकाऱ्यांची सहमती असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, ट्रस्टने यात कुलकर्णी सोबत कुठलाच संबंध नसल्याचे जाहीर प्रगटनातून स्पष्ट केले. परंतु, अद्याप यात कुठलीच कायदेशीर कारवाई न झाल्यानेही संशय वाढला आहे. मात्र, महापालिकेच्या कारवाईने ६५० कोटींचा मलिदा लाटण्याचा डाव फसला आहे.
मनपाकडे स्व-विकास शुल्क भरणा
श्री राम मंदिर मठ बालाजी ट्रस्टच्या जागा सपाटीकरण करणे आणि इतर कामे करण्यासाठी गतवर्षी मार्च २०२५ मध्ये मुकुंद कुलकर्णी आणि ट्रस्टच्या एकाने महापालिकेकडे अर्ज केला होता. त्याद्वारे स्व-विकाससाठी (सेल्फ डेव्हलपमेंट) परवानगी मागितली होती. त्यात मनपाने ४७ हजारांचे चलनही दिले होते.
प्लॉट ८५ लाख ते दीड कोटीला
या जागेत मागील चार वर्षांपासून प्लॉट विक्री सुरू आहे. यात लहान प्लॉट अगोदर ६० लाखांना विक्री केले. मागील दोन वर्षांपासून लहान प्लॉट ८५ आणि मोठ्या आकाराचे प्लॉट दीड कोटी रुपये असा दर सुरू होता, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
अनेकांनी बुकिंग शुल्कच दिले
देवाच्या जमिनीतील प्लॉट विक्री करताना ही वर्ग २ प्रवर्गातील जमीन असल्याने बहुतांश जणांनी बुकिंग शुल्कापोटी १५ ते २० लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम जमीन अधिकृत झाल्यावर देण्याचे ठरले होते.