

Marathwada Drought : From the Pages of History — Barren Wastelands Deal a Major Blow to the Rural Economy
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा १८९९ ते १९०० मधील दुष्काळाची बरीचशी माहिती दस्ताऐवजात उपलब्ध आहे. तत्कालिन आयुक्तांनी तयार केलेल्या अहवालातही त्यावर भाष्य केले आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर काही निरीक्षणे नोंदविली. आता धाराशिव जिल्ह्यात असणारा नळदुर्ग तालुका हे तेव्हा जिल्ह्याचे ठिकाण होते. हैदराबाद आणि मराठवाड्याचे प्रवेशव्दार असल्याने त्यास विशेष महत्व होते. या अहवालातील काही प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे.
छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नळदुर्ग व बिदर परिसरात शेतीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. विहिरींच्या पाण्यावर घेतली जाणारी काही पिके वगळता बहुतांश ठिकाणी रब्बीचे पीक दिसून आले नाही. त्यापूर्वी पीक चांगले आल्यामुळे देशात धान्याचा काही प्रमाणात साठा उपलब्ध होता, ही एक दिलासादायक बाब होती. कन्नड तालुक्यासह काही भागांत खरीप पीक पूर्णपणे हातचे गेले नव्हते.
काही ठिकाणी खरीपाचे उत्पादन समाधानकारकही झाले होते. हिंगोलीच्या उत्तरेकडील गावांच्या परिसरात शेतकऱ्यांना कडब्याचे चांगले उत्पादन मिळाले होते. दुष्काळाच्या काळात कडब्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तो विकून काही प्रमाणात आर्थिक आधार मिळविला. या भागात परतीचा पाऊस न झाल्यामुळे ज्वारीला कणसे आली नाहीत. मात्र पिकाची रोपे उंच वाढल्याने मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध झाला.
नांदेडमध्ये परिस्थिती तुलनेने सुधारलेली होती. या जिल्ह्यातील काही भाग दुष्काळाच्या तडाख्यात सापडला होता. मात्र जिल्ह्याचा उर्वरित भाग तुलनेने चांगल्या स्थितीत होता. विशेषतः दक्षिणेकडील बिलोली परिसरातील पिके बऱ्यापैकी चांगली होती. त्यामुळे पीक कापणीसाठी ब्रिटिश अधिपत्याखालील जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मजूर नांदेड तसेच लगतच्या निजामाबाद जिल्ह्यात दाखल झाले होते. नळदुर्ग जिल्ह्याला दुष्काळाचा अत्यंत गंभीर फटका बसला होता. लातूर–येडशी मार्गावर काही प्रमाणात ज्वारीची पिके दिसत असली, तरी हा प्रदेश संभाजीनगरप्रमाणे पूर्णपणे ओसाड झालेला नव्हता.
मात्र उपलब्ध पिकांचे उत्पादन अत्यल्प असून, ते पूर्ण क्षमतेच्या तुलनेत केवळ दोन ते तीन आण्यांपर्यंतच राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. नळदुर्गमधील जनतेची अवस्था इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक बिकट होती. अलीकडील काळात या भागाला वारंवार नापिकीचा सामना करावा लागल्याने दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले होते. बिदर जिल्ह्यात उदगीर, राजुरा आणि निलंगा या तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसला होता. मात्र जिल्ह्याच्या इतर भागात परिस्थिती तुलनेने समाधानकारक होती.
त्या काळात या भागात सरकारी मदतकार्य सुरू करण्याची विशेष गरज भासत नव्हती. एकूणच, या प्रदेशातील दुष्काळाची तीव्रता सर्वत्र सारखी नसली तरी अनेक भागांत रब्बी पिकांचा अभाव, खरीपातील अपुरे उत्पादन आणि वारंवार होणारी नापिकी यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. काही भागांतील चारा उत्पादन आणि चांगल्या पिकांमुळे परिस्थितीला काही प्रमाणात आधार मिळाला असला, तरी नळदुर्गसारख्या भागात जनतेसमोरील संकट अत्यंत गंभीर होते.
तत्कालिन नळदुर्ग जिल्ह्यात असलेल्या ढोकी येथे उभारलेल्या दुष्काळग्रसतांच्या छावणीत अन्नाअभावी मृत्युला सामोरे जाण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. (ऐतिहासिक दस्ताऐवजातील छायाचित्र)..