हळद लागण्यापूर्वीच बालविवाह रोखला file photo
छत्रपती संभाजीनगर

हळद लागण्यापूर्वीच बालविवाह रोखला

वडगाव कोल्हाटी येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह दामिनी पथक आणि बालकल्याण समितीने उधळून लावला.

पुढारी वृत्तसेवा

The marriage of a 16-year-old minor girl was stopped by the Damini Squad and the Child Welfare Committee

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वडगाव कोल्हाटी येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह दामिनी पथक आणि बालकल्याण समितीने उधळून लावला. रविवारी (दि. २२) घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच पथकाने छापा टाकून हा विवाह रोखला. या कारवाईमुळे बालविवाहाला बळी पडणाऱ्या एका मुलीचे भविष्य वाचले असून, नातेवाइकांकडून लेखी बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.

वडगाव कोल्हाटी येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी तातडीने महिला व बालकल्याण समितीच्या आम्रपाली बोर्डे यांना कळविले. संयुक्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता तिथे लग्नाची जय्यत तयारी आणि पाहुण्यांची लगबग असल्याचे दिसून आले.

हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच पोलिसांनी एन्ट्री केल्याने उपस्थितांची चांगलीच धांदल उडाली. पोलिसांनी विवाहस्थळी मुलीच्या नातेवाइकांकडे चौकशी केली असता कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समोर आले. नियोजित वधू आणि वर या दोघांनाही वडील नाहीत. मुलीची आई धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.

गरिबीमुळे नातेवाइकांनीच एकत्र येऊन आर्थिक मदत करत या विवाहाचा घाट घातला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा विवाह टळला. या घटनेनंतर बालकल्याण समितीच्या प्रतिनिधी आणि अंगणवाडी सेविकांनी मुलीच्या आईसह मुलाच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले. नातेवाइकांनी आपली चूक मान्य केली.

पोलिसांनी त्यांच्याकडून लेखी बंधपत्र लिहून घेतले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईला आणि मुलाच्या नातेवाइकांना सर्व कायदेशीर कागदपत्रांसह मंगळवारी (दि.२४) सिडको एन-१२ येथील बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली लता जाधव, कल्पना खरात, सुधाकर पवार, पूजा जाधव, अमृता भोपळे, सीता ढाकणे आणि बाळू वने यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT