जमीन करमाडची, मालक हैदराबादचे अन् तिरुपतीची तोतया महिला file photo
छत्रपती संभाजीनगर

जमीन करमाडची, मालक हैदराबादचे अन् तिरुपतीची तोतया महिला

१३ एकर जमिनीचा सौदा करून ७० लाख उकळणारी टोळी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

The land belongs to Karmad, the owners are from Hyderabad, and the imposter woman is from Tirupati

संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : करमाड शिवारातील कोट्यवधींच्या जमिनीचे मूळ मालक हैदराबादचे असल्याने त्यांच्या दाक्षिणात्य नावाशी साधर्म्य असल्याचा फायदा घेत ब्रोकर दाम्पत्याने चक्क तिरुपती येथील एका एम. एस्सी. शिक्षित महिलेला तोतया मालक म्हणून उभे केले. दोघांना विक्रीचा सौदा करून तब्बल ७० लाख रुपयांचा गंडा घातला. मूळ मालक पुरुष असतानाही एका महिलेला चक्क सायन्ना रायचुरी नावाचे बनावट आधारकार्ड देऊन उभे केले. अखेर हा हायप्रोफाईल जमीन घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधार पती-पत्नीसह तिरुपतीतून तोतया महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

अधिक माहितीनुसार, मूळ जमीन मालक तिरुपतीत केवळ एका सायन्त्रा रायचुरी हे हैदराबाद येथील मोठे कंत्राटदार असून, त्यांची जालना रोडला लागून १३ एकर जमीन आहे. त्यांची एक मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे राहते. त्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून ब्रोकर राजू जाधव आणि त्याची पत्नी वैशाली जाधव यांनी फसवणुकीचे जाळे विणले.

सायन्ना रायचुरी हे पुरुष असतानाही, त्यांच्या दाक्षिणात्य नावाशी साधर्म्य दाखवण्यासाठी आरोपींनी तिरुपती येथील उच्चशिक्षित व्ही. लता ऊर्फ ई. लता सुरेश हिला गाठले. तिला १३ लाख रुपयांचे आमिष दाखवून शहरात बोलावले आणि तिच्या नावाने सायन्ना रायचुरी असे बनावट आधारकार्ड तयार केले.

आरोपींनी या बनावट ओळखीच्या आधारे संतोष शिवाजी वैद्य आणि मनोज गटकाळ यांच्याशी जमिनीचा सौदा केला. संतोष वैद्य यांच्याकडून ५० लाख रुपये उकळले. मनोज गटकाळ यांच्याकडून २० लाख रुपये घेऊन फसवणूक केली. खरेदीखत करण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादींनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघड झाला.

तिरुपतीत केवळ एका फोटोवरून अटक

ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, सहायक फौजदार सरला माने, दीपेश नागझरे, नीलेश गायकवाड यांच्या पथकाने तिरुपती गाठले. मुख्य महिला आरोपी ई. लता सुरेश ही कोणताही मोबाईल वापरत नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र केवळ एका फोटोच्या आधारे ५ ते ६ किलोमीटरचा परिसर पिंजून काढून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून गुन्ह्यातील १९ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

व्ही. लता एमएस्सी बायो पदवीधर

तिरुपती येथील आरोपी व्ही. लता ही एमएस्सी बायोटेक्नॉलॉजीची पदवीधर असून, तिने नामांकित तीन ते चार कंपन्यांमध्ये जॉब केलेला आहे. मात्र, लग्नानंतर कौटुंबिक ताण-तणावातून तिने नोकरी सोडली. त्यानंतर तिची ओळख राजू जाधव सोबत झाली. त्याने तिला १३ लाखांचे आमिष दाखविले. घरी कंदुरीच्या कार्यक्रमासाठी तिला जेवणाचे निमंत्रण देऊन बोलावले होते. ती चारवेळा शहरात येऊन गेल्याचे समोर आले आहे.

तिन्ही आरोपी गजाआड

या आंतरराज्य फसवणुकीचा उलगडा होताच ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिन्ही प्रमुख आरोपींना अटक केली आहे. यामध्ये राजू उर्फ कचरू विठ्ठल जाधव (सध्या पोलिस कोठडीत), त्याची पत्नी वैशाली राजू जाधव (सध्या न्यायालयीन कोठडीत) आणि ई. लता सुरेश (रा. तिरुपती): हिला न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सुरेशचा शोध आणि पतसंस्थेवरही गुन्हा

राजू जाधव वैशाली जाधव व्ही. लताचा पती सुरेश यानेही मुलीच्या आजारपणाचे कारण सांगून राजू जाधव कडून मोठी रक्कम घेतली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तसेच, या व्यवहारातील बनावट नावाचे चेक वटवण्यासाठी मदत करणाऱ्या बंगलोर येथील गजलक्ष्मी क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT