The impact of the Gulf War on rural areas
पैठण, पुढारी वृत्तसेवा : युद्धजन्य परिस्थितीचे चटके आता ग्रामीण भागातही बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून सिलिंडरची टंचाई युद्धाचा भडका जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात गॅस सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी प्रामुख्याने चुलींचा वापर केला जात असे; मात्र उज्ज्वला योजनेमुळे आणि गॅसच्या सहज उपलब्धतेमुळे ग्रामीण भागातील चित्र पूर्णपणे बदलले. सरपण गोळा करण्याचे कष्ट आणि धुरामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळाल्याने गृहिणींनी गॅस वापरालाच पसंती दिली आहे.
या बदलामुळे तालुक्यातील बहुतांश कुटुंबांनी घरातील पारंपरिक चुली कायमच्या बंद केल्या. अनेक नवीन घरांच्या बांधकामात तर आता चुलीसाठी जागाच ठेवली जात नाही. ज्या घरांत पूर्वी चुली होत्या, तिथे आता आधुनिक गॅस शेगड्या आल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील लोकांची इंधनासाठी संपूर्ण मदार केवळ गॅसवरच आहे.
गॅस कंपन्यांकडून स्थानिक वितरकांकडे होणारा पुरवठा घटल्याच्या तक्रारी आहेत. पैठण तालुक्यातील विविध गॅस एजन्सींकडे विचारणा केली असता, वरूनच साठा कमी येत आहे, असे उत्तर मिळत आहे. यामुळे एकदा सिलिंडर संपले की, नवीन सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेत डिलिव्हरी मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर शाळा, महाविद्यालयांना सुटी असते. अशा वेळेत जिथे घरा-घरात पाहुण्यांची मोठी वर्दळ आणि नातेवाईकांच्या मांदियाळी असते. या काळात ठिकठिकाणी मोठ्या जेवणा वळींचे आयोजन केले जाते. अशा मोठ्या प्रमाणावरील स्वयंपाकासाठी गॅसची गरजही मोठ्या प्रमाणावर भासते; मात्र सध्याची टंचाई पाहता गॅस संपला तर काय करायचे, असा मोठा प्रश्न ग्रामीण जनतेसमोर उभा आहे. चुली कायमच्या हटवल्यामुळे आता स्वयंपाकासाठी दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.
घरगुती नियोजन कोलमडले
गॅस सिलिंडर बुकिंगच्या कालावधीत सातत्याने वाढ केली जात आहे. बुकिंग केल्यानंतर अनेक दिवस वाट पाहावी लागत असल्याने गॅसधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन यात्रांच्या तोंडावर हा कालावधी वाढल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक आणि घरगुती नियोजन कोलमडले आहे