The Guardian Minister expressed his displeasure to Atul Chavan after observing the substandard work at Ghati Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घाटीत गोरगरीब रुग्णांना चांगल्या उपचारासोबत तशा सुविधाही मिळाव्यात म्हणून कोट्यवधींचा निधी दिला. मात्र त्यातून झालेल्या कामांचा निकृष्ट दर्जा आणि किरकोळ कामेही रखडलेली पाहून पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पारा चांगलाच चढला. '१४ कोटींमध्ये नवीन बिल्डिंग तयार होते. मात्र ३ वर्षांत तुमच्याकडून १४ कोर्टीतून साधी दुरुस्ती कामे झाली नाहीं ? अशा शब्दांत त्यांनी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांना फैलावर घेत सर्वांसमोरच झाप झाप झापले. रखडलेली दुरुस्तीची कामे तातडीने करा अन्यथा थेट कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी अतुल चव्हाण यांना दिला.
मराठवाड्यासह १८ जिल्ह्यांतील रुग्णांसाठी आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयातील इमारती आणि वॉर्डात दुरुस्ती आणि किरकोळ कामांसाठी तसेच रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून शासन सातत्याने निधी उपलब्ध करून देत आहे. गेल्या वर्षी डीपीडीसीमधून ५५ ते ६० कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला. तरीही बांधकाम विभागाच्या असहकार्यामुळे घाटीत अनेक कामे अर्धवट आणि रखडल्याचे दिसत असल्याने पालकमंत्र्यांनी रविवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता एस. एस. भगत आणि अधिकाऱ्यांसह रुग्णालयाच्या विविध विभागांची पाहणी केली.
यात तुटलेल्या ग्रॅनाईट फरशी दुरुस्तीअभावी खराब झालेल्या सुविधा आणि निकृष्ट दर्जाचे काम बघून पालकमंत्री बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारावर भडकले. या कामासाठी जबाबदार असलेले अधिकारी अतुल चव्हाण यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. किरकोळ कामे होत नसतील तर आम्ही कशाला इतके पैसे देतो? असा संतप्त सवालही केला. तसेच कंत्राटदारालाही सुनावले. रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी विषय मांडणार
पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री शिरसाट म्हणाले, घाटीत १४ कोटींच्या निधीतील निकृष्ट कामांची सखोल आणि गांभिर्याने चर्चा आगामी डीपीडीसी बैठकीत केली जाईल. तसेच कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही हा विषय मांडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दोषींवर गुन्हा दाखल करा
घाटीतील रुग्णांच्या सुविधांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. त्या निधीचा कोणी गैरफायदा घेतला, अपहार केला तर कारवाई करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
उन्हाळा संपला छत नाही
रुग्ण, नातेवाइकांना उन्हापासून संरक्षणासाठी अपघात विभागासमोर आरसीसी बांधकामात छत उभारणीचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. यासाठी कॉलमची फक्त पायाभरणी करून धोकादायक लोखंडी सळ्या तशाच सोडून दिल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका असल्याने वारंवार पत्र देऊनही बांधकाम विभागाकडून काम सुरू झालेले नाही.