The fate of hundreds is sealed in the voting machine
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ व पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी २८१ मतदान केंद्रांवर शनिवारी शांततेत मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे पहिल्या आठ तासांत ४८.७६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान संपेपर्यंत तालुक्यात जवळपास ७२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या मतदान प्रक्रियेद्वारे जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३६ व पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी निवडणूक लढवणऱ्या ६४ अशा शंभर उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. याचा निकाल ९ फेब्रुवारीला (सोमवारी) येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात मतमोजणी झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे.
तालुक्यात एक लाख १७ हजार १७२ पुरुष व एक लाख सात हजार २१६ स्त्री अशा सुमारे दोन लाख २४ हजार ३८८ मतदारांची नोंद झाली होती. पहिल्या सत्रात सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत अतिशय संथ मतदान झाले. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत केवळ ३७ हजार १३६ म्हणजे १६.५५ टक्के मतदान झाले. त्यांनतर दुपारच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष मतदार मतदानासाठी बाहेर चित्र ग्रामीण भागात बघायला मिळाले. वयोवृद्ध व दिव्यांग व्यक्तींनीही अतिशय उत्साहात या लोकशाहीचा उत्सवात आपला सहभाग नोंदवला.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जन्हाड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर राखीव ईव्हीएम यंत्रासह चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कुठेही गैरप्रकार झाला नाही. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचा वेग वाढून ३२.२५ टक्के मतदान झाले.
नंतरच्या दोन तासांत म्हणजे साडे तीन वाजेपर्यंत ५७ हजार १६२ पुरुष व ५२ हजार २४० स्त्री अशा एक लाख नऊ हजार ४०२ मतदारांनी (४८.७६ टक्के) मतदारांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजेनंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. शेवटच्या सत्रात मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर गर्दी केली होती.
आघुरला पकडला बोगस मतदार
तालुक्यातील आघुर येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान ओळखपत्र घेऊन आलेल्या एका व्यक्तीस गावकऱ्यांनी संशयावरून पकडले. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने सोमनाथ पाटेकर असे सांगितले व शंकर नावाच्या एका काकाने ओळखपत्र दिल्याचे सांगितल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे. तथापि त्याने प्रत्यक्ष मतदान न केल्याने कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.