The 'Drug' Insect, a friend of farmers, is on the verge of extinction
संजय मूचक
कन्नड : मृग नक्षत्राच्या आगमनासोबतच ग्रामीण भागात दिसणारा लाल रंगाचा मखमली " मृग किडा अर्थात इंद्रगोप हा शेतकऱ्यांचा नैसर्गिक मित्र मानला जातो. मात्र रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा वाढता व अतिरेकी वापर यामुळे हा उपयुक्त किडा आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून, मृग नक्षत्राला सुरुवात होऊनही मृग किडा दिसेनासा झाला आहे.
मृग नक्षत्राच्या काळात, साधारण जून महिन्यात पहिल्या पावसानंतर जमिनीतून बाहेर येणारा हा लाल मखमली किडा ग्रामीण भागात मृग किडा, इंद्रगोपकिंवा लाल मखमली किडा म्हणून ओळखला जातो. पूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात दिसणारा हा किडा आता दुर्मिळ होत चालला आहे. मृग किडा वर्षभर उघड्यावर दिसत नाही. तो बहुतेक काळ जमिनीखाली खोलवर किंवा पालापाचोळ्याच्या थरामध्ये सुप्त अवस्थेत राहतो.
मऊ, ओलसर आणि वाळूमिश्रित पिवळसर मातीमध्ये तो स्वतःचे बीळ तयार करून वास्तव्य करतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिली दमदार सर बरसल्यावरच हे किडे जमिनीवर येतात. नर-मादी मिलन आणि अन्नाच्या शोधासाठी ते सकाळी व संध्याकाळी फिरताना दिसतात. कडक उन्हात मात्र ते बाहेर पडत नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता मृग किडा पिकांचे कोणतेही नुकसान करत नाही. उलट तो शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
हा किडा पिकांना हानी पोहोचवणाऱ्या विविध कीटकांची अंडी, अळ्या आणि लहान कीटकांवर उपजीविका करतो. मावा, तुडतुडे, कोळी तसेच इतर उपद्रवी किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्वाचे काम तो करतो. याच्या अळ्या टोळ आणि नाकतोड्यासारख्या पिकांची नासाडी करणाऱ्या कीटकांवरही उपजीविका करतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होऊन शेतकऱ्यांचा रासायनिक औषधांवरील खर्च कमी होण्यास मदत होते.
मृग किडा जमिनीतील सूक्ष्म परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. तो अशा सूक्ष्म जीवांवर नियंत्रण ठेवतो जे उपयुक्त बुरशी आणि जीवाणूंना हानी पोहोचवतात. त्यामुळे पालापाचोळ्याचे विघटन वेगाने होऊन जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते आणि जमीन अधिक सुपीक बनते. यामुळे त्याला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. पूर्वी पाऊस पडल्यावर मृग किडा जमिनी बाहेर निघाल्यास शेतकऱ्यांच्या महिला त्याची हळदी कुंकू ने पूजा करत होत्या आता मात्र मृग किडा सह आता पूजा करण्याची प्रथा ही काळानुसार लोप पावत चालली आहे.
नैसर्गिक अधिवास नष्ट
शेतीमध्ये वाढत्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे, कीटकनाशकांमुळे आणि तणनाशकांमुळे मृग किड्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जमिनीतील जैवविविधतेवर याचा विपरीत परिणाम होत असून या उपयुक्त किड्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. सेंद्रिय शेती आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धतींचा अवलंब केल्यास या नैसर्गिक मित्राचे संवर्धन होऊ शकते. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि शेतीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मृग किड्यासारख्या उपयुक्त जीवांचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक घटकांचा वापर कमी करून सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे वळल्यास या दुर्मीळ होत चाललेल्या किड्याचे अस्तित्व जपणे शक्य होणार असल्याचे मत कृषितज्ज्ञ व पर्यवरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.