जिल्हा परिषदेचा आज फैसला File photo
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषदेचा आज फैसला

सर्वाधिक मतदान परभणीत, उमेदवारांची धाकधूक; दुपारपर्यंत होणार चित्र स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

The District Council's decision will be made today

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, परभणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मतमोजणी सोमवारी होणार असून, दुपारी चार वाजेपर्यंत मिनी मंत्रालय कोणाकडे हे स्पष्ट होईल. मराठवाड्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले असून, २ हजार ८१९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात शनिवारी बंद झाले होते.

मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी प्रत्येक मतदारसंघात चुरस होती. प्रत्येक मतदारसंघात सोयीच्या झालेल्या आघाडीने गावागावात ईर्ष्या होती. त्यातून अनेक मतदारसंघांत अटीतटीच्या लढती झाल्या. जिल्हा पातळीवरील नेत्यांसह स्थानिक नेत्यांनी प्रत्येक लढत प्रतिष्ठेची केली, परिणामी प्रचाराचा दहा पंधरा दिवस अक्षरशः धुरळा उडाला होता. याच चुरशीने आणि ईष्र्येने जिल्ह्यात सर्वच ठिकाणी चुरशीने आणि ईष्र्येने शनिवारी ७४.३५ टक्के मतदान झाले.

लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ उमेदवार, तर दहा पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सकाळी १० पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

जिल्ह्यात मतदान यंत्रावरील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी १४२ टेबल लावण्यात आले आहेत. लातूर येथे २०, अहमदपूरमध्ये १४. उदगीर येथे १४, निलंगा येथे २०, औसा येथे १८, रेणापूर येथे १६, देवणी येथे १२, शिरूर अनंतपाळ येथे ८, चाकूर येथे १० आणि जळकोट येथे १० टेबलवर ईव्हीएम मतमोजणी होईल. यासोबतच टपाली मतपत्रिका मोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यात १ हजार २९१ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धाराशिवमध्ये होणार २४ फेऱ्या धाराशिवात मतमोजणीसाठी एकूण १५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, सुमारे १५० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. धाराशिव तालुक्यात १२ गट व २४ गण असून, त्यानुसार एकूण २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे.

सुरुवातीला टपाली मतमोजणी पूर्ण होताच लगेच ईव्हीएम मोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्पष्ट केले. परभणी तालुक्यातील १० जिल्हा परिषद गटांसाठीची मतमोजणी ४० टेबलवरून ७फेऱ्यांमध्ये होणार आहे.

पूर्णा तालुक्यातील ६ गटांसाठी १२ टेबलवरून मतमोजणी होणार आहे. पालम तालुक्यातील ४ गटांसाठी १० टेबलवरून मतमोजणी होणार आहे. गंगाखेड तालुक्यातील ७ गटांसाठी १४ टेबलवरून मतमोजणी होणार आहे. पालम, पूर्णा, गंगाखेड या तीनही तालुक्यासाठी टपाली मतदान मोजण्यासाठी प्रत्येकी दोन वेगळे टेबल करण्यात आले आहेत.

राज्यातील तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यानुसार राज्यात एकूण ६६. २८ टक्के मतदान झाले आहे. परभणी येथील ९ पंचायत समितीसाठी सर्वाधिक ७४.८९ टक्के मतदान झाले. तर पुण्यात ६८.३५ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने रविवारी यासंदर्भातील अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार यंदा राज्यात ६६. २८ टक्के मतदान झाले आहे. यात एकूण १ कोटी ४१ लाख ९० हजार २११ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.

यात कोल्हापूर ७४.४५ टक्के, छत्रपती संभाजीनगर ७२.६९ टक्के आणि परभणी ७४.८९ टक्के मतदान झाले आहे. सर्वात कमी ५५.७९ टक्के इतके मतदान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाले. यंदा रायगड येथे ६९.९१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. रायगडपाठोपाठ रत्नागिरी ५५.७९, सिंधुदुर्ग ६१.९८, पुणे ६८.३५, सातारा ६७.८०, सांगली ६९.७६, सोलापूर ६५.९०, कोल्हापूर ७४.४५, छत्रपती संभाजीनगर ७२.६९, परभणी ७४.८९, धाराशिव ६५.२२ टक्के आणि लातूर ६३.७९ टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती आयोगाने जाहीर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT