The dispute between Kotkar and Dr. Tarak, which arose from a misunderstanding, ended amicably.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण करू नये, कारण त्यामुळे गावातील जातीय सलोखा बिघडू शकतो, असा आरोप करत डॉ. रमेश तारक यांनी दीड वर्षापूर्वी विरोध दर्शवला होता. या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या सुनील कोटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रागाच्या भरात डॉ. रमेश तारक यांच्या चेहऱ्याला काळे फासले होते. मात्र त्याच डॉ. तारक यांचा बुधवारी (दि.३१) सुनील कोटकर यांनी जाहीर सत्कार करत दुग्धाभिषेक केल्याने गैरसमजातून निर्माण झालेल्या या वादाचा शेवट गोड झाला आहे.
२०२४ मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो समाजबांधवांनी मुंबईचा रस्ता धरला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे जरांगे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णय (जी आर) काढला. त्यानंतर जरांगे यांच्या समवेत समाजबांधव परतले. यानंतर काही महिन्यांनी जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसणार होते. त्यावेळी डॉ. तारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत विरोध दर्शवल्यावर हा प्रकार घडला होता. दरम्यान, कोटकर यांनी बुधवारी आपला गैरसमज दूर झाल्याचे सांगत डॉ. तारक यांच्यावर दुग्धाभिषेक केला.
यावेळी ते म्हणाले, डॉ. तारक यांचा हेतू जरांगे यांना उपोषणापासून रोखण्याचा नसून, त्यांच्या निवेदनामागे गावातील जातीय सलोखा अबाधित ठेवण्याची भूमिका होती. मात्र त्यावेळी हा मुद्दाचुकीच्या पद्धतीने समजला गेला आणि भावनिक प्रतिक्रिया उमटली. पण देर आये, दुरुस्त आये, असे सांगत कोटकर यांनी यावेळी दिलगिरी व्यक्त केली.
शेवटी सत्य समोर आलेच : डॉ. रमेश तारक
आज खरेच माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. एका समाजबांधवांचा गैरसमज होता, तो आज पूर्णपणे दूर झाला आहे. त्यावेळी मी प्रतिकार करू शकत होतो; मात्र केला नाही. कारण मला माहीत होते, सत्य समोर यायला वेळ लागते, मात्र ते येते. आज सत्य समोर आले आणि त्यांना स्वतःची चूक उमगली, याचे समा धान आहे. असे डॉ. रमेश तारक यांनी सांगितले.