

1773 candidates found valid in scrutiny
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी २९ प्रभागातून दाखल झालेल्या १८७० उमेदवारी अर्जाची बुधवारी (दि.३१) सर्व ९ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननीची प्रक्रिया पार पडली. यात विविध कारणाने ९७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे रिंगणात १७७३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
महापालिका निवडणुकीत यंदा उमेदवारांचा चांगलाच उत्साह दिसत आहे. प्रत्येकाने आपापले अर्ज दाखल करण्यापूर्वी त्याची चांगल्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली. काहींनी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच तपासणी करून घेतल्याने बहुतांश उमेदवारांचे अर्ज छाननीच्या प्रक्रियेत वैध ठरले आहेत.
तर अवैध अर्जाची संख्या अतिशय कमी राहिली आहे. येत्या २ जानेवारीला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेनंतरच खरे उमेदवार किती याचा अंदाज येणार आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या छाननीमध्ये मनपा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय-१ झालेल्या १७८ उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर १४५ अर्ज वैध ठरले तर ३३ अवैध ठरविण्यात आले.
त्यामुळे आता उमेदवार वैध ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय-२ यांच्याकडे १५, १६, १७ प्रभागांतून प्राप्त झालेल्या २०८ उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर अरुण गुदगे, शाम इंगळे, सीमा डोळस, धीरज वर्मा या उमेदवारांचे पाच अर्ज अवैध, तर २०३ उमेदवार वैध ठरले आहेत.