

A tight race for the municipal elections due to instability?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत तिकीट वाटपाचा टप्पा संपताच राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. अपेक्षित उमेदवारी न मिळाल्याने भाजप, शिंदेसेना व एमआयएम या राजकीय पक्षात निर्माण झालेली नाराजी, बंडखोरी यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या अस्थिरतेतून कोणता पक्ष सावरतो आणि कोणता अडखळतो, यावरच अंतिम निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे.
सुमारे दहा वर्षांनतंर महापालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षांनी जिंकण्याची क्षमता हा निकष पुढे करत उमेदवार ठरवले. मात्र एका जागेसाठी तब्बल १० ते १२ इच्छुक असल्याने पक्षांनी महापालिका ताब्यात घेण्यासाठीचे सूत्र ठेवून उमेदवार निवडल्याचा दावा या पक्षांकडून केला असला तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये असंतोष वाढल्याचे यादी जाहीर झाल्यानंतर दिसून आले आहे.
काही प्रभागांत अधिकृत उमेदवारांसोबतच बंडखोरांनी इतर पक्षांकडून उमेदवारी मिळवत मैदानात उतरले असल्याने मतांचे विभाजन अटळ मानले जात आहे. त्यामुळे पूर्वी एकतर्फी वाटणाऱ्या लढती आता अटीतटीच्या बनल्या आहेत. या परिस्थितीचा थेट परिणाम प्रचारावरही दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पक्षीय मुद्द्द्यांपेक्षा वैयक्तिक ओळख, स्थानिक पकड आणि संपर्क यावर अधिक भर दिला जात आहे.
त्यामुळे ही अनेक उमेदवार पक्ष चिन्हापेक्षा स्वतःच्या कामगिरीचा दाखला देत मतदारांना साद घालत आहेत. यामुळे महापालिका निवडणूक अधिकच व्यक्तिकेंद्रित होत चालल्याचे निवडणूक संघटनात्मक ताकदीची खरी कसोटी ठरणार आहे.
अंतर्गत मतभेद वेळेत मिटवून कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यात जो पक्ष यशस्वी ठरेल, त्यालाच मतदारांचा विश्वास मिळण्याची शक्यता अधिक असून, नाराजी आणि गटबाजी वाढत राहिल्यास त्याचा फटका थेट मतपेटीत बसू शकतो. यावरून तिकीट वाटपानंतरची ही अस्थिरता निवडणुकीला अधिक रंगतदार बनवत असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील डॅमेज कंट्रोल, समजूत काढण्याचे प्रयत्न आणि संघटनात्मक एकजूट यावरच महापालिकेच्या सत्त्-ोचा मार्ग ठरणार आहे.