The construction of the bridge over the Khelna River in Palod has been stalled.
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : पालोद गावाजवळील खेळणा नदीवरील सुमारे ४ कोटी ९८ लाख रुपये खर्चाचा व ९० मीटर लांबीच्या पुलाचे काम निविदा प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील ठेकेदारास देण्यात आले आहे. निविदेच्या अटी व शर्तीप्रमाणे हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास एक वर्षाचा कालावधी देण्यात आलेला असताना, काम सुरू होऊन जवळपास नऊ महिने उलटूनही पुलाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेतच आहे.
या अर्धवट कामामुळे पालोद गावासह परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना नदीपात्रातून किंवा लांब पल्ल्याचा वळसा घेऊन प्रवास करावा लागत असून हा प्रवास विशेषतः विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
रात्रीच्या वेळी एखादी आपत्कालीन घटना घडल्यास किंवा रुग्णांना उपचारासाठी सिल्लोडला नेण्याची गरज भासल्यास, अर्धवट पुलाचे काम नागरिकांसाठी मोठा धोका व आव्हान ठरत आहे. पावसाळ्यात ठेकेदाराने तात्पुरत्या रहदारीसाठी केलेला रस्ता वाहून गेल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रुग्णांना मोठा वळसा घ्यावा लागत आहे.
विशेषतः गावात एखादी अप्रिय घटना अथवा मृत्यू झाल्यास अंत्ययात्रेसाठी ग्रामस्थांना नदीपात्रातील खडतर मार्ग पार करावा लागत असून यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खेळणा नदीवरील या पुलामुळे पालोदसह चिंचपूर, चांदापूर, हट्टी, बहुली, केळगाव, मुर्डेश्वर व अंभई आदी गावांचा सिल्लोडशी थेट संपर्क होत असल्याने पुलाचे काम रखडल्याचा परिणाम संपूर्ण परिसरावर होत आहे.
लवकरच कामाला सुरुवात होईल
सदरील पुलाचे काम सुमारे ७० ते ७५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. एजन्सीने तत्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच काम सुरू होईल, अशी माहिती जलसंधारण विभागाचे उपअभियंता राजधर दांडगे यांनी दिली