Vasantrao Naik : पहिला पाऊस पडल्यानंतर शंभर रुपयांचे पेढे वाटणारा मुख्यमंत्री File Photo
छत्रपती संभाजीनगर

Vasantrao Naik : पहिला पाऊस पडल्यानंतर शंभर रुपयांचे पेढे वाटणारा मुख्यमंत्री

संभाजीनगर दौऱ्यावर असताना पाऊस झाला आणि पत्रकारांना पेढे दिले..

पुढारी वृत्तसेवा

The Chief Minister who distributed pedha after the first rain

छत्रपती संभाजीनगर : राज्यात या आठवड्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. पूर, अतिवृष्टीमुळे शेतीला फटका बसला आहे. अनेक भागात आठ दिवसांपूर्वी शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असताना आता एवढा पाऊस झाला की, ओला दुष्काळ जाहीर करा, अशा मागण्या पुढे येत आहेत. पण पहिला पाऊस पडल्यानंतर खिशातील शंभर रूपयांची नोट काढून पेढे वाटणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊन गेला..वसंतराव नाईक हे त्यांचे नाव..

घटना आहे 1972 ची. मराठवाड्यात सर्वत्र भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले होते. पाहणी दौर्‍यानंतर सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारपरिषदेसाठी ते आले आणि पावसाला प्रारंभ झाला. तेव्हा उपस्थित पत्रकार म्हणाले, पेढे आणा..वसंतरावांनी आपल्या खास नजरेतून पत्रकारांकडे बघितले आणि खिशातून शंभर रुपये काढीत अधिकार्‍याला दिले व पेढे आणायला सांगितले, अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य यांनी सांगितली.

राज्यात हरितक्रांती घडवून आणण्यात नाईक यांचा वाटा मोलाचा राहिल्याचे चरित्रकारांनी नमूद केले आहे. या वैदर्भिय नेत्याचा शेती हा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. ‘महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक’ या साहित्य व संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत लेखक उतम रूद्रवार यांनी नाईक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला आहे. या पुस्तिकेत पावसाचे आगमन झाल्यानंतर नाईक पेढे वाटत असे नमूद केले आहे.

पावसाशी अतूट नाते

या पुस्तिकेडतील एक उतारा असा...‘पावसाळा सुरू झाला होता, पण पाऊस पडत नव्हता. चातक पक्षासारखे शेतकरी डोळ्यात प्राण आतून पावसाची वाट पाहत होते आणि एकदा आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमली, धो-धो पाऊस पडू लागला. नाईकसाहेबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. अतिशय आनंदाने आपला शिपाई महंमद याच्या हाती शंभराची नोट देऊन त्याला त्यांनी पेढे आणण्यासाठी पिटाळले. पाऊस पडला म्हणून पेढे वाटणारा हा मुख्यमंत्री जगावेगळाच म्हणावा लागेल. त्यावेळी सुधाकरराव नाईक यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांना मुंबईहून नाईकसाहेबांनी फोन केला. मुख्यमंत्र्यांचा फोन म्हणून सुधाकररावांनी मोठ्या लगबगीने फोन घेतला. फोनवरून नाईकसाहेबांनी विचारले, इकडे मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे, तिकडे आपल्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती आहे? इकडेही पाऊस सुरू आहे, असे सुधाकररावांनी सांगताच अतिशय आनंदाने आणि हर्षोल्लासाने सुधाकररावांच्या वक्तव्याला त्यांनी दाद दिली. पाऊस आणि नाईकसाहेबांचे मोठे अतूट नाते होते.’

’हिरवा माणूस’ असे वर्णन

सुप्रसिद्ध नाटककार, ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार विद्याधर गोखले यांनी नाईक यांचे वर्णन ’हिरवा माणूस’ या समर्पक शब्दात केलेले आहे. लता राजे यांनी नाईक यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी वसंतराव नाईकांना विचारले, की मनापासून दाद द्यावी असा कोणता क्षण तुमच्या जीवनात असू शकतो? राजे यांची अशी कल्पना होती की, विधान सभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनतोड तर्कसंगत अशा प्रकारची उत्तरे देऊन त्याच्यावर मात करण्याचा, त्यांना नामोहरम करण्याचा प्रसंग असेल. त्याचे वर्णन ते करतील. तथापि क्षणाचाही विलंब न लागू देता नाईकसाहेब म्हणाले, आधी पावश्ये ओरडून जातात, मग चाहुलही न लागता, शिरीषाचे प्रचंड वृक्ष गुलाबी फुलांच्या तुर्‍यांनी लहडतात, पाखरांची, अगदी मुंग्याचीही लगबग सुरू होते.........पत्ता नसतो फक्त मनुष्यप्राण्याला, मग एक दिवस ध्यानीमनी नसताना पश्चिमेला काळे ढग जमू लागतात. सर्वत्र पिवळट संधीप्रकाश भरून राहतो. आणि पाहता पाहता पाणकळा येतात. तो क्षण फक्त दादच घेतो. असे नाही तर मला जिंकून जातो..

वसंतराव नाईक जवळपास सलग १२ वर्ष मुख्यमंत्री होते. प्रदीर्घ काळ पदावर राहिल्यानंतर मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी पुढे आली. पक्षातंर्गत असलेली धुसफूस पाहता त्यांना पदावरून दूर व्हावे लागले. त्यानंतर मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT