

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये वरील भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरणाची पाणी पातळी ९५ टक्के झाली आहे. गुरुवारी (दि.२१) सकाळी सहा ते सात वाजेदरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदा-वरी नदीपात्रात ९४३२ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणाचे एकूण अठरा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात येणार आहेत.
जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्याने ३१ जुलै रोजी जायकवाडी धरणात ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विलासबापू भुमरे यांच्या हस्ते जल पूजन करून धरणाचे १८ दरवाजे उघडून गोदा वरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडला होता. ४ ऑगस्टदरम्यान धरणामध्ये येणारी आवक कमी झाल्यामुळे उघडलेले धरणाचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला होता.
बुधवारी (दि.२०) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ९५.२१ क्युसेक पाण्याची टक्केवारी नोंद करण्यात आल्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, धरण उपअभियंता मंगेश शेलार यांनी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
या संदर्भात महसूल, पोलिस, नगरपरिषद, पंचायत समिती विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासन स्तरावर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पैठण, जुने कावसान, चनकवाडी, पाटेगाव, वडवळी, नायगाव, मायगाव, कुराणपिंपरी, आपेगाव, नवगाव, तुळजापूर, आवडे उंचेगाव, टाकळी अंबड, हिरडपुरी येथील शेतकरी, नागरिकांनी गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नाही व शेती साहित्य विद्युत मोटर पाळीव प्राण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, प्रभाकर घुगे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, बीडीओ मनोरमा गायकवाड, गटविकास अधिकारी राजेश कांबळे आदी उपस्थित होते.
नाशिकसह भंडारदारा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सायंकाळपर्यंत जायकवाडी धरणात जमा होणार आहे. धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करून पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी सुरक्षारक्षक तैनात ठेवले असल्याची माहिती घरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिले आहे.