

Marathwada receives one and a half times the average rainfall in August
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चालू महिन्यातील मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ऑगस्ट महिन्यात विभागात सरासरी १२४ मिमी पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात गेल्या वीस दिवसांतच १८९ मिमी इतका म्हणजे मासिक सरासरीपेक्षा १५१ टक्के इतका पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक अडीचशे टक्के तर बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात ऑगस्टच्या सरा-सरीच्या जवळपास दोनशे टक्के पाऊस पडला आहे.
मराठवाड्यात १४ ऑगस्टपासून १७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. लहान मोठे सिंचन प्रकल्प भरल्याने त्यांच्या दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला. परिणामी अनेक गावांना पाण्याने वेढले. या पावसामुळे ऑगस्ट महिन्यातील अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. मराठवाड्यात पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ६७९ मिमी पाऊस पडतो.
त्यातील जून आणि जुलै या दोन महिन्यांत विभागात ३२० मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा या दोन्ही महिन्यांत २८५ मिमी म्हणजे अपेक्षित सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस झाला होता. मात्र आता ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. सद्यस्थितीत विभागात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांतील अपेक्षित सरा-सरीच्या १०६ टक्के पाऊस झाला आहे. तर एकट्या ऑगस्ट महिन्याचा विचार केल्यास या महिन्यात सरासरी-पेक्षा दीडपट पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील अपेक्षित सरासरी ही १२४ मिमी इतकी आहे. प्रत्यक्षात या महिन्यात आतापर्यंत १८९ मिमी पाऊस झाला आहे.