The body was stripped of its jewelry and dumped in another field.
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : घरी आलेल्या ओळखीच्या महिलेचा मृत्यू झाल्याने अंगावरील दागिने काढून घेतले व रात्रीच मृतदेह चक्क बारा किमी अंतरावरील तालुक्यातील पिंपळगाव पेठ भवन रस्त्यावरील पुलाच्या नाल्यात टाकून पसार झाले. ही घटना सोमवारी (दि. २२) दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी सोमवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तर मंगळवारी रात्री मृत वृद्धेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून दागिने काढून पुरावा नष्ट करणे, अशा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रकलाबाई रामदास साळवे (६८, रा. यशवंतवाडी, सिल्लोड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अलका देवीदास गाडेकर (रा. पिंप्री, ता. सिल्लोड) असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
घटनेची आधिक माहिती अशी की, मृत महिला शहरालगत असलेल्या यशवंतवाडी येथे राहत होती. तर रविवारपासून मृत महिला घरातून निघून गेलेली होती. सोमवारी पिंपळगाव पेठ भवन रस्त्यावरील पुलाच्या नाल्यात महिलेचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदनात हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र मृताच्या घरापासून बारा किमीवर मृतदेह मिळाल्याने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती.
पोलिसांनी गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेज तपासले व धक्कादायक माहिती समोर आली. मृत महिला व आरोपी महिला मोलमजुरी करीत असल्याने त्यांची चांगली ओळख होती. रविवारी मृत महिला आरोपी महिलेच्या घरी गेली. यादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच महिलेने मृताच्या अंगावरील दागिने काढून घेतले व मृतदेह रात्रीच व्याह्याच्या मदतीने एका रिक्षातून पिंपळगाव पेठ शिवारात आणून टाकला, असे तपासात समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोन्या-चांदीचे दागिने जप्त
दरम्यान, मृत महिलेच्या अंगावरील काढलेले १ लाख ७३ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे. तर आरोपी महिलेलाही ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक मनीष जाधव, लहू घोडे, बीट जमादार दीपक पाटील, रविकिरण भारती, दीपक इंगळे यांनी केला.