

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या दोन मुलांना हॉर्न देऊनही बाजूला सरकत नसल्याने त्यांना आवाज देताच दोघांनी कारचालकाला बेदम मारहाण सुरू केली. ब्लेडने हल्ला चढवून दगडाने डोके फोडले. ही घटना रविवारी (दि. २१) सायंकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, मुकुंदवाडी येथे घडली. आणि आदित्य अर्पण डोंगरदिवे अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी राजेन अनिल तटवारे (२७, रा. लायन्स क्लब कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, तो सीएनजी भरण्यासाठी कार घेऊन चिकलठाणा येथे निघाला होता. रस्त्यातून सरका म्हणताच दोन्ही आरोपींनी शिवीगाळ केली. राजेन कारच्या खाली उतरताच आदित्यने ब्लेडने हल्ला केला.
त्याचा हात धरताच अर्पणने दगड मारून डोके फोडले. रक्तबंबाळ राजेन यांनी डोक्याला हात लावताच पुन्हा आदित्यने दगड डोक्यात मारला. त्यानंतर त्यांना पुन्हा बेदम मारहाण करून अर्पणने हाताला चावा घेत कानाला बोचकारले. आता सोडतो, पुन्हा भेटलास तर ब्लेडने मारून टाकतो, अशी धमकी देऊन पळून गेले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.