The BJP secured only one out of seven mayoral positions, while the Shiv Sena was successful in two places.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
नगरपरिषदांच्या निवडणुकीत राज्यात सत्ताधारी भाजपने मोठी आघाडी घेतली, परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र भाजपला आपला करिश्मा दाखवता आलेला नाही. जिल्ह्यात भाजपला सातपैकी केवळ एकाच ठिकाणचे नगराध्यक्षपद मिळविता आले, तर त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने दोन ठिकाणचे नगराध्यक्षपद मिळवत महायुतीत जिल्ह्यात आपणच मोठे भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी मतदान झाले होते. त्याचे निकाल रविवारी (दि. २१) घोषित झाले. गतवर्षी शिवसेना भाजप युतीने जिल्ह्यात विधानसभेच्या सर्व नऊपैकी नऊ जागा जिंकल्या होत्या, मात्र आता नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत युतीला त्या प्रमाणात यश मिळविता आले नाही.
भाजपला केवळ वैजापूर येथील एकमेव नगराध्यक्षपद मिळविता आले. तिथे भाजपचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी विजयी झाले. गंगापूर आणि फुलंब्री येथे आमदार असूनही भाजपला तेथील जागा मिळवता आल्या नाहीत. सिल्लोड येथे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नगरपरिषदेतील सत्ता अबाधित ठेवली आहे. सिल्लोड येथे सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर विजयी झाले.
पैठण येथेही शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या कावसानकर विजयी झाल्या आहेत. त्यामुळे तिथे शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे यांचा करिश्मा कायम असल्याचे दिसून आले. काँग्रेसला जिल्ह्यात खुलताबाद आणि कन्नड या दोन ठिकाणी यश मिळाले, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला गंगापूर नगराध्यक्षपद मिळाले आहे. जिल्ह्यात महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये नेहमीच मोठा, छोटा भाऊ हा वाद रंगतो. मात्र यावेळी शिवसेनेने भाजपपेक्षा एक नगराध्यक्षपद अधिक मिळवून मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे.
शिवसेनेचे सर्वाधिक ५४ नगरसेवक विजयी
सात नगरपरिषदांमधील विजयी नगरसेवकांच्या संख्येचा विचार करता सर्वाधिक ५४ जागा या शिवसेनेला मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला ३९ जागा मिळवता आल्या, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. जिल्ह्यात भाजपचे ३७ नगरसेवक विजयी झाले आहेत. कॉंग्रेसचे १९, शिवसेना उबाठा पक्षाचे १४, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आणि ५ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष
सिल्लोड : अब्दुल समीर: शिंदेसेना
पैठण : विद्या कावसानकर :
शिंदेसेना
कन्नड : शेख फरीनबेगम
काँग्रेस
खुलताबाद : आमेर पटेल :
काँग्रेस
गंगापूर : संजय जाधव : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
वैजापूर : दिनेश परदेशी : भाजप
फुलंब्री : राजेंद्र ठोंबरे : शिवसेना (उबाठा)-