The BJP is now lobbying for nominated corporator positions
अमित मोरे
छत्रपती संभाजीनगर: महापौर, गटनेता पदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया झाल्यानंतर आता भाजपमध्ये अनेकांचे लक्ष हे स्वीकृत नगरसेवक पदाकडे लागले आहे. हे पद मिळवण्यासाठी पक्षातील अनेक जुने आणि कार्यक्षम पदाधिकारी-कार्यकर्ते इच्छुक आहेत. परंतु, त्यांना बाजूला करून नेत्यांनी आपापल्या कुटुंबातील सदस्यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळावे, यासाठी फिल्डिंग लावली आहे. एवढेच काय तर धर्मदाय आयुक्तालयात संस्थाच्या याद्यांमध्ये नाव नोंदणीचे प्रकारही वाढले आहेत.
महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यात भाजपचे सर्वाधिक ५७नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने आता महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार कोण, यावरून पक्षाच्या इच्छुक नगरसेवकांमध्ये इशानी भरतीनगर महानगरपासिका छत्रपती संभाजीनगर जोरदार रस्सीखेच पहावयाला मिळाली.
प्रत्येक नेत्यांनी आपापल्या इच्छुकाची नावे पक्षाश्रेष्ठींकडे मांडले होते. शहरातूनच या पदासाठी लॉबिंग झाली नाही तर, शहरालगतच्या जालना जिल्ह्यातूनही महापौरपदासाठी आपल्या मर्जीतील उमेदवारासाठी माजी मंत्र्यांनी जोर लावला होता. परंतु, पक्षाकडून समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. राजूरकर हे विद्यार्थी दशकापासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.
दरम्यान, महापौरपदी त्यांच्या निवडीनंतर आता पक्षात सर्वांचे लक्ष हे स्वीकृत सदस्य नगरसेवकपदाकडे लागले आहे. ज्यांना महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यासर्वांनी आता स्वीकृत नगर सेवकावर दावा केला आहे. यातील काहींनी तर आपापल्या स्थानिक नेत्यांमार्फत फिल्डिंगही सुरू केली आहे. परंतु, यात सर्वात आघाडीवर काही नेत्यांची मुलेदेखील असल्याची चर्चा आहे. पक्षाने उमेदवारी डावलल्याने आता किमान स्वीकृत नगर-सेवकपद तरी द्यावे, यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांऐवजी आपल्या मुलांचेच नाव पुढे केल्याची माहिती काही कार्यकर्त्यांनी दिली.
भाजपला मिळेल ५ स्वीकृत
नव्या नियमानुसार यंदा महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. दहा नगरसेवकांमागे १ यानुसार स्वीकृतची संख्या १० ते ११ एवढी होईल. त्यात भाजपला ५७नगरसेवकांमागे किमान ५ स्वीकृत मिळेल, अशी शक्यता आहे.
नेत्यांच्या नावाने पत्ते कट
महापालिका निवडणुकीवेळी काही स्थानिक नेत्यांनी प्रदेशातील नेत्याचे नाव पुढे करून अनेकांच्या उमेदवारीचे पत्ते कट केले होते. तीच पद्धत आता स्वीकृतच्या इच्छुकांसाठी वापरली जाणार असल्याची देखील चर्चा आहे.
धर्मदायमध्ये चेंजरिपोर्टसाठी गर्दी
स्वीकृत नगरसेवकपदासाठी सेवाभावी संस्थेचा ५ वर्षे जुना पदाधिकारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुकांनी धर्मदाय आयुक्तालयात संस्थांचे चेंज ऑफ रिपोर्ट सादर करण्यासाठी गर्दी केली आहे.