युतीमुळे भाजप-शिवसेनेतील निवडणुकीची गणिते बदलली File Photo
छत्रपती संभाजीनगर

युतीमुळे भाजप-शिवसेनेतील निवडणुकीची गणिते बदलली

कन्नड : ऐनवेळी इच्छुकांची पक्षांतरे; काहींचा फायदा, काहींचा हिरमोड

पुढारी वृत्तसेवा

The alliance has changed the electoral calculations for the BJP and Shiv Sena

संजय मुचक

कन्नड : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वेळेवर झालेली भाजप-शिवसेना युती तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी अंतिम क्षणी शिवसेनेने आपल्याला सुटलेल्या चार गटांव्यतिरिक्त इतर तीन जिल्हा परिषद गटांसाठी दिलेले एबी फॉर्म, यामुळे तालुक्यातील निवडणुकीची राजकीय गणिते पूर्णपणे बदलून गेली आहेत.

भाजपने अंतिम टप्प्यात एका उमेदवाराला एबी फॉर्म देण्याची रणनीती अवलंबल्याने शिवसेनेचीही काही प्रमाणात अडचण झाली. ही रणनीती शिवसेनेला थोडी आधी समजली असती, तर उमेदवारांची निवड अधिक प्रभावी करता आली असती, अशी चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकूणच युतीच्या निर्णयातील विलंब, इच्छुकांची पक्षांतरे आणि अंतिम क्षणातील एबी फॉर्म वाटप या सर्व घडामोडींमुळे तालुक्यातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे.

त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून आगामी राजकीय समीकरणे कशी आकार घेतील, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजप-शिवसेना युतीमुळे शिवसेनेतील काही इच्छुकांना ऐनवेळी उमेदवारी गमवावी लागल्याने तालुक्यात पक्षांतरांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

केतन काजे यांनी शेवटच्या क्षणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पिशोर गटासाठी उमेदवारी स्वीकारली आहे. गेल्या चार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणारे डॉ. दिलीपसिंग राजपूत यांची शिवसेनेकडून उमेदवारी कापण्यात आल्याने त्यांनी काँग्रेसकडून नागद गटासाठी उमेदवारी घेतली आहे.

भाजप-शिवसेना युतीत डच्चू मिळाल्याने अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हतनूर गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच यशोदाबाई पवार यांनाही युतीचा फटका बसल्याने त्यांनी जेहूर गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले आहे.

विवेक शेळके यांच्या उमेदवारीला युतीचा फटका बसल्याने त्यांनी देवगाव रंगारी गटासाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशोक दापके यांनी अंधानेर गणातून घड्याळ निशाणीवर, तर औराळा गणातून स्वयप्रभा माणिक पगारे यांनी मशाल निशाणीवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडींमुळे कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार व चुरशीची ठरणार, हे मात्र निश्चित झाले आहे.

इतर पक्षांना मिळाले तुल्यबळ उमेदवार

भाजप-शिवसेना युतीची घोषणा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी सायंकाळी झाली. यातून दोन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. अनेक इच्छुकांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस तसेच रायभान जाधव विकास आघाडीची वाट धरली. त्यामुळे या चारही पक्षांना अल्प कालावधीतच तुल्यबळ उमेदवार मिळाले. हा या निवडणुकीतील एक महत्त्वाचा राजकीय बदल मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT