The Ajanta-Ellora International Film Festival end
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवारी (दि.१) झाला. यावेळी भारतीय चित्रपट स्पर्धेतील मानाचे सुवर्ण कैलास पारितोषिक परज्या या चित्रपटास प्रदान करण्यात आले.
समारोप समारंभास प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व निर्मात आनंद एल. राय, ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
दग्दर्शक आनंद एल. राय म्हणाले, आपल्या मनाला आवडते तेच करत जगणे म्हणजे खरे जगणे आहे. आपल्या प्रवासात यश आणि अपयश येत राहते मात्र, आपण त्या दोन्हींही भूमिकातून जात असताना शिकत राहणे आवश्यक असते. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मी वारंवार येत राहीन; विशेषतः या महोत्सवातून जात असताना मी साऱ्या गोष्टी शिकून जात आहे. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वर्षानुवर्षे वाढत असून हा आपला महोत्सव आता राष्ट्रीय पातळीवर चर्चिला जात आहे.
यंदाच्या वर्षी अगदी कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद, केरळ आणि चेन्नई अशा देशभरातील विविध भागांतून रसिक प्रेक्षक या महोत्सवात सहभागी झाले आहेत. संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल म्हणाले, या महोत्सवात संपूर्ण जगभरातील चित्रपट दाखविण्यात आले. माणसाच्या हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता चित्रपटात असते. सुवर्ण शालिवाहन हा पुरस्कार मराठी चित्रपटासाठी पुढच्या वर्षीपासून दिला जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिव कदम यांनी केले, तर संयोजक नीलेश राऊत यांनी आभार मानले.
महोत्सवाचे नाव देशभरात
महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, आजच्या या समारोप समारंभात समाधानाची भावना आहेत. हा महोत्सव सहा दिग्दर्शक म्हणून काम करीत आहेत. विशेषतः हे सगळे दिग्दर्शक आयोजक म्हणून काम करीत आहोत. दिवसेंदिवस या महोत्सवाचा परीघ वाढत आहे. देशभरातून प्रेक्षक या महोत्सवात सहभागी झाले होते. या महोत्सवाचे नाव आज देशभर पोहोचले आहे.