Thackeray Sena's protest against ministers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मंत्र्यांविरोधात शिवसेना उबठा पक्षाच्या वतीने सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील मंत्र्यांची मला वाटतेय असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आले, तसेच मंत्र्यांच्या कारनाम्यांबाबत विडंबनात्मक पथनाट्य सादर करत पत्ते खेळले गेले, नृत्य करणाऱ्या मुलीवर नोटाही उधळण्यात आल्या.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी गळ्यात पत्त्यांच्या माळा भातल्या होत्या, हातात रम्मीवाल्या मंत्र्याची लाज वाटते, डान्सबारवाल्या मंत्र्याची लाज वाटतेय, हनीट्रॅपवाल्या मंत्र्याची लाज वाटते, जादूटोण्यावाल्या मंत्र्याची लाज वाटतेय असे लिहिलेले फलक होते. अशी ही बनवाबनवी या चित्रपटासारखे एक पोस्टरही यावेळी सर्वांच्या लक्ष वेधून घेत होते. या पोस्टरवर निर्माता, दिग्दर्शक आणि संवादक राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दर्शविण्यात आले होते. तर कलाकार म्हणून संजय नोटवाले, रम्मीराव ढेकळे, योगेश डान्सबारवाले, गुलाबी महाजन व अघोरी जादूवाले असे नाव देण्यात आले होते. तसेच मंत्री संजय शिरसाठ, भरत गोगावले, गिरीश महाजन, योगेश कदम व माणिकराव कोकाटे यांची प्रतिमा दाखविण्यात आली होती.
तासाभराच्या या आंदोलनादरम्यान मंत्री योगेश कदम यांच्याविरोधात डान्सबारचे, मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात नोटांच्या बंडलांचे, मंत्री कोकाटे यांच्याविरोधात रम्मी खेळतानाचे, मंत्री गोगावले यांच्याविरोधात जादूटोणाचे प्रतीकात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. याप्रसंगी पथनाट्यात नृत्य करणार्या मुलीवर खोटपा नोटा उधळण्यात आल्या. कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करून महाराष्ट्राची बदनामी थांबविण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात विजयराव साळवे, अनिल चोरडिया, राजेंद्र राठोड, राजू वैद्य, माजी आमदार उदयसिंग राजपूत, नानासाहेब पळसकर, संतोष जेजुरकर, दत्ता गोर्डे, अशोक शिंदे, विजय वाघमारे, लक्ष्मण भाऊ सांगळे, राजू इंगळे, किशोर कच्छवाह, गिरीजाराम हाळनोर, अरविंद धीवर, सुनिता आऊलवार, सुनिता देव, दुर्गा भाटी, अनिता मंत्री, आशा दातार, राखी परदेशी, हनुमान शिंदे आदी पदाधिकारी सहभागी झाले.
महाराष्ट्रातील मंत्री मोठ्या प्रमाणात घोटाळे करत आहेत. नोटावाले, हनी ट्रॅपवाले, म्मीवाले, डान्स चारवाले आणि जादूटोण्णावाले महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का ? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच सध्या देशात मोदी सरकारकडून दडपशाही सुरू आहे. त्याविरोधात जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. ज्या प्रमाणे बांगलादेशात लोकांनी सत्ता उलथून टाकली तसे इथे घडू शकते, असा इशाराही खैरे यांनी दिला.
सध्या महाराष्ट्रात अनागोंदी सुरू आहे. राज्य सरकारला आणि मंत्र्यांना जनतेचे सोयरसुतक उरलेले नाही. एक मंत्री विधानसभेत रम्मी खेळतो. तर दुसरे मंत्री कुणी नोटांची बंडले जमवितो, कुणी डान्सबार चालवितो. या सर्व कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विर ोधात शिवसेनेने आवाज उठवला आहे. हा आवाज या कलंकित मंत्र्यांना घरी बसल्याशिवाय शांत होणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी दिला.