

The path to admission of 14 thousand students is paved, admission and examination will be held on NEP pattern.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत सीबीसीएस प्रणालीतील विविध पटॅर्नमधून प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या द्वितीय वर्ष प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागला असून, त्यामुळे अधांतरी असलेल्या सुमारे १३ ते १४ हजार विद्यार्थ्यांना द्वितिय वर्षात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा धोरणात्मक निर्णय सोमवारी (दि.११) झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरापासून सीबीसीएम पॅटर्नमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या द्वितीय वर्ष पदवी प्रवेशाचा प्रश्न अधांतरी होता. या बाबत विद्या परिषद आणि विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्यांनी निवेदनाद्वारे विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच अधिसभा सदस्य हरिदास सोमवंशी यांनी प्र-कुलगुरुंकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
याची दखल घेत अधिष्ठाता मंडळाने सोमवारी तातडीने ही बैठक बोलवली होती. सीबीसीएस प्रणालीतील सर्व पॅटर्नच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना एनईपी- २०२० पॅटर्नमध्ये प्रवेशित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता.
बैठकीत शिक्कामोर्तब
सोमवारी विद्या परिषदेची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यावर अधिष्ठाता परिषदेने ७ जुलैला सीबीसीएस प्रणालीतील विविध पॅटर्नमधून प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या आणि गेल्यावर्षी प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी द्वितीय वर्षात एनईपी २०२० पॅटर्नच्या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब केला आहे.