

Rickshaw driver abuses woman, police also assaulted
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा कामगार उपआयुक्त कार्यालयातील कामगार अधिकारी महिलेला रिक्षाचालकाने भाडे देण्यावरून अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. पर्ससह मोबाईल हिसकावून घेत वाद घातला. महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या कर्तव्यावरील वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना देखील रिक्षाचालकाने धक्काबुक्की करून धमकावले. हा प्रकार सोमवारी (दि.११) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन सिग्नलवर घडला.
युसुफ मोहम्मद अली अन्सारी (२७, रा. मोमीनपुरा मस्जीदजवळ दौलताबाद) असे आरोपीचे नाव असून त्याला रिक्षासह अटक केल्याची माहिती वेदांतनगर ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. फिर्यादी महिला (वय ३६, रा. न्यू मोंढा रोड, गायजीनगर, जि. जालना) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या कामगार उपआयुक्त कार्यालय येथे सरकारी कामगार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
त्या सोमवारी सायंकाळी कामगार उप आयुक्त कार्यालय मालजीपुरा एसटी वर्कशॉप समोरून रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी आरोपीच्या शेअरिंग रिक्षात बसल्या. रेल्वेस्टेशनला उतरल्यानंतर आरोपी यूसुफने महिलेला तुम भिकारी हो क्या? ऐसे नंगे लोग मै रिक्षा मैं बिठाता नहीं, मुझे २० रुपये दे दो असे म्हणून त्याने अश्लील शिवीगाळ करून अंगावर धावून आला. अब तु बहोत पच्छतायेगी, असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली. धमकी देऊन आरोपी रिक्षाचालक यूसुफने फिर्यादीला वाईट हेतुने हाताला स्पर्श केला. तिच्या हातातील पर्स व मोबाईल हिसकावून घेतला. सर्व गोंधळ पाहून जवळच सिग्नलवर उभे असलेले वाहतूक शाखेचे दोन अंमलदार धावले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गिरी करत आहेत.
रेल्वेस्टेशन चौक येथे कर्तव्यावरील वाहतूक अंमलदार गिरी हे फिर्यादी व आरोपीचा वाद पाहून मदतीला आले. तेव्हा आरोपी युसूफने अंमलदार गिरी व त्याचे सहकारी राठोड यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. गिरी यांचे हातातील चलन मशीन खाली फेकून दिली. तुझ्यामुळेच हे झाले, तुझ्यावरच केस करतो अशी पोलिस अंमलदाराला रिक्षाचालकाने धमकी देत धक्काबुक्की केली. रिक्षात बसून पळून जाताना अंमलदारानी त्याला पकडले. त्यानंतर वेदांतनगर पोलिसांनी धाव घेऊन रिक्षाचालक युसूफला ताब्यात घेतले.
रिक्षाचालकांची मुजोरी एवढी वाढली आहे की थेट पोलिसांच्या वर्दीवरच हात टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काही रिक्षाचालक नशापाणी करून रिक्षा चालवून अनेक गुन्ह्यांत देखील सहभागी असल्याचे काही घटनांवरून समोर आलेले आहे. महिला, मुलींना एकटीने रिक्षातून प्रवास करताना भीती वाटते. छेडछाडीच्या देखील अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे यावर पोलिसांनी पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.