Sambhajinagar News : गोरक्षकावरील जीवघेणा हल्ल्याने तणाव; संघटनांनी तासभर रोखला जालना रोड  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : गोरक्षकावरील जीवघेणा हल्ल्याने तणाव; संघटनांनी तासभर रोखला जालना रोड

अवैध कत्तलखाने आठ दिवसांत उद्ध्वस्त करण्याचा अल्टिमेटम

पुढारी वृत्तसेवा

Tension over deadly attack on cow vigilante; Organizations block Jalna Road for an hour

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गोवंश पकडून दिल्याच्या कारणावरून चिकलठाणा परिसरात गोरक्षक गणेश शिंदे यांच्यावर बुधवारी (दि.८) २० ते २५ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या हिंसक घटनेच्या निषेधार्थ विविध संघटना आक्रमक झाल्या असून, क्रांती चौकात घोषणाबाजी करून आंदोलकांनी थेट चिकलठाण्यातील मिनी घाटीसमोर गायी रस्त्यावर आणून दुपारी साडेबाराच्या सुमारास तासभर वाहतूक रोखून धरली.

यावेळी पाच आर-ोपींना अटक झाल्याने उर्वरित आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. येत्या आठ दिवसांत शहर व जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने त्वरित उद्ध्वस्त करून हल्ल्यातील आरोपींच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याची जोरदार मागणी करण्यात आली. पोलिसांनीही कारवाई सुरू असून, आठ दिवसही लागणार नाहीत, असे आश्वासन देऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकाळी १०:३० वाजता क्रांती चौक येथे भाजपा शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिव-सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, विश्व हिंदू परिषदेचे संजय गायकवाड, माजी उपमहापौर विजय औताडे, हर्षवर्धन केणेकर, कुणाल मराठे, अभिषेक कादी, सुभाष बोडखे यांच्यासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घो-षणाबाजी केली. क्रांती चौकातून आंदोलनकर्त्यांनी हल्ला झालेल्या चिकलठाणा परिसरात धाव घेतली. संतप्त घोषबाजीमुळे तणाव निर्माण झाला होता. चिकलठाण्यात गोशाळेतील गायींना थेट रस्त्यावर आणून दोन्ही बाजूंचा रस्ता तासभर रोखून धरला. पोलिसांशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, आंदोलकांनी ७ दिवसांत बुलडोझर कारवाईचा अल्टिमेटम देत अखेरीस आंदोलन मागे घेतले. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

न्यायालयाच्या आवारात तगडा बंदोबस्त

गणेश शिंदे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी फेरोज हसन कुरेशी (३३), इसा गफुर कुरेशी (४५), उफेज जाफर कुरेशी (२०), आणि रुक्सार इसा कुरेशी १ (३८) या चार आरोपींना अटक केली. एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाला निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. रुक्सार इसा कुरेशी याला वैद्यकीय कारणामुळे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर तीन आरोपींना न्यायालयाने ७दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संतप्त जमाव हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेता तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सुनावणी संपेपर्यंत न्यायालयाच्या आवाराला छावणीचे स्वरूप आले होते.

पोलिसांकडून आश्वासनंतर रस्ता केला मोकळा

डीसीपी रत्नाकर नवले, प्रशांत स्वामी, एसीपी मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, एम सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सिटी चौकच्या निरीक्षक निर्मला परदेशी, पुंडलिकनगरचे निरीक्षक अशोक भंडारे, साताऱ्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे, जिन्सीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, जवाहरनगरचे निरीक्षक सचिन कुंभार यांच्यासह एसआरपी, दंगा काबू पथकाच्या तुकड्या असा मोठा फौजफाटा मिनी घाटी समोर होता. पोलिसांकडून पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, संबंधित विभागाच्या अधिकऱ्यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. योग्य ती कारवाई सुरू झाली आहे. कोम्बिंग केले जात आहे. अवैध कत्तलखाने आठ दिवसांच्या आत नष्ट करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले. तसेच उर्वरित आरोपीही लवकरच अटक होतील, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोहल्ल्याकडे जाण्यापासून रोखले

चिकलठाणा परिसरात तणाव निर्माण झाला होता. मिनी घाटी समोरच्या गोशाळेजवळ आंदोलन सुरू झाले. तेथून गायी घेऊन आंदोलन थेट घटनास्थळ असलेल्या मोहल्ल्याकडे निघाले. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना वेळीच रोखून धरल्याने चिघळणारी परिस्थिती आटोक्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT