छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऑरिक बिडकीन डीएमआयसीतील स्मार्ट सिटीच्या औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराला आता पायाभूत सुविधांच्या माध्यमातून वेग मिळणार आहे. ऑरिकच्या सेक्टर बी आणि सीमध्ये ६० मीटर रुंदीचा मुख्य रस्ता आणि पायाभूत सुविधांसाठी ४९८ कोटींची निविदा काढून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामामुळे या दोन्ही सेक्टरमधील औद्योगिक भूखंडांना जोडणी मिळण्यासोबतच भविष्यातील उद्योगांसाठी आवश्यक वाहतूक आणि युटिलिटी नेटवर्क उभारण्यास मदत होणार आहे.
ऑरिक-बिडकीनच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ८,००० एकर प्रकल्पाचे तीन उपविभाग करण्यात आले होते. त्यापैकी पहिला टप्पा सुमारे १,२०० हेक्टर (३,००० एकर) क्षेत्रात विकसित करण्यात आला. मात्र, गेल्या काही वर्षात स्थानिक औद्योगिक संस्थांच्या पाठपुराव्यामुळे येथे टोयोटा, जेएसडब्ल्यू यांसारखे मोठे प्रकल्प आले. त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी पाहिल्या टप्प्यातील B आणि C सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन एकत्रित करून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर या सेक्टरच्या सर्वंकष पायाभूत सुविधा विकासासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडने ४९८ कोटी रुपयांची निविदा काढली आहे.
या निविदेचा मुख्य उद्देश बी आणि सी सेक्टरमध्ये उद्योगांना आवश्यक असलेल्या रस्ते व सर्व संबंधित पायाभूत सुविधा उभारणे हा आहे. या कामात ६० मीटर रुंदीचे प्रमुख रस्ते, अंतर्गत स्स्ते, पूल, नाले व पावसाच्या पाण्याचा निचरा यांचा समावेश आहे. स्स्त्यांसोबतच दुतर्फा वृक्षलागवड आणि आवश्यक नागरी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यात पाणीपुरवठा प्रकल्पाची मुख्य वाहिनी, वितरण व्यवस्था, जलसाठा, अग्निशमन यंत्रणा, सांडपाणी संकलन, स्वतंत्र वाहिन्या, पंपिंग व्यवस्था, घरगुती सांडपाण्याची सुविधा, त्याचे पुनर्वापर, पावसाच्या पाण्याचा निचरा, यासह विविध सोयीसुविधांचा समावेश आहे.
सुविधा उभारणीसह देखभाल-दुरुस्ती उद्योगांसाठी आवश्यक असलेली वीज वितरण व्यवस्था, उपकेंद्रे, आरएमयू, रोहित्रे आणि संबंधित सुविधा उभारण्यात येणार आहेत. संपूर्ण पायाभूत सुविधांचे आधुनिक पद्धतीने नियंत्रण व देखरेख करण्यासाठी स्काडा प्रणाली प्रस्तावित आहे. या सुविधा निर्माण करण्यासाठी ४९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पॅकेजचे काम ईपीसी पद्धतीने होणार असून काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. तर कामातील दोष दायित्व कालावधी हा चार वर्षांचा असेल. त्यासोबतच ४ वर्षांचा संचालन आणि देखभाल कालावधी आहे. सेक्टर बी आणि सीमधील ६० मीटर रुंदीच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.
कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम
या रस्त्यामुळे बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. मोठ्या उद्योगांना तसेच त्यांच्या पुरवठा साखळीतील कंपन्यांना मालवाहतुकीसाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल. यामुळे नवे उद्योग अकर्षित होतील.
औद्योगिक विस्ताराला गती
या निविदेची अंतिम तारीख १४ सप्टेंबर २०२६ आहे. रस्ते आणि युटिलिटीची कामे पुढे सरकल्यास बिडकीन ऑरिकमधील औद्योगिक विस्ताराला आणखी गती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे