Ten-hour jalsamadhi protest in the dead of winter
रमाकांत बन्सोड
गंगापूर : जायकवाडी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील पाण्यामुळे असंपादित शेतजमिनीतील पिकांचे वारंवार नुकसान होत आहे. त्याबदल्यात मिळणारी नुकसान भरपाई मात्र वर्षभर सतत पाठपुरावा करूनही आजच्या हमीभावानुसार अद्याप मिळालेली नाही. जायकवाडी पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख विभागाने केलेल्या संयुक्त मोजणी अहवालाची माहिती न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.२३) अमळनेर बस्ती (ता. गंगापूर) येथे ऐन थंडीत तब्बल दहा तास जलसमाधी आंदोलन केले.
सकाळी अकरा वाजता सुरू झालेले आंदोलन नऊ वाजेपर्यंत सुरू होते. अमळनेर, लखमापूर व गळनिंब येथील शेतकऱ्यांनी फुगवट्याच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. पाण्यालगत शेकोटीची ऊब घेत अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलनस्थळी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत (नाथनगर, उत्तर पैठण) व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक नुकसान भरपाईचे प्रश्न मार्गी लावू, भूसंपादनासाठी प्रयत्न करू तसेच संवेदनशीलतेने हा विषय सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी संयुक्त मोजणी अहवाल व परिशिष्ट-१६नुसार सर्व बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, तसेच बाधित मागणी शेतजमिनी अधिग्रहित करून घ्याव्यात, अशी शेतकऱ्यांनी केली.
या आंदोलनात राधेश्याम कोल्हे, समद पठाण, इसाभाई पठाण, बालचंद पंडित, संतोष टेकाळे, मुनीर पठाण, शिवाजी दरगुडे, कडू बाबा पठाण, विक्रम पंडित, जनार्धन मिसाळ, किरण साळवे, साहेरा पठाण, शाईन पठाण, मीना कोल्हे, सविता मिसाळ, मंदाबाई दरगुडे, अल्काबाई नरवडे आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी दीपककुमार डोंगरे (उपविभागीय अभियंता, जायकवाडी पाटबंधारे), शाखा अभियंता मंगेश शेलार, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे व पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड उपस्थित होते.
दरम्यान, जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना दिलेल्या लेखी पत्रात तहसील विभागामार्फत समिती गठित करून महसूल, कृषी व जलसंपदा विभाग संयुक्तरीत्या पंचनामे करून पीक नुकसान भरपाईचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
सदर कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात येईल. तसेच यापूर्वी तयार करण्यात आलेले नुकसान भरपाई प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येतील, असे आश्वासनही लेखी स्वरूपात देण्यात आले आहे.
वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष
जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर फुगवट्याचे पाणी असंपादित शेतकऱ्यांच्या सातबारा क्षेत्रात शिरते. त्यामुळे उभ्या पिकांचे पूर्ण नुकसान होत असून, पिकासाठी केलेला सर्व खर्च पाण्यात जात आहे. दीर्घकाळ पाणी साचून राहिल्याने शेतजमीन नापीक होत असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही एक वर्ष उलटून गेले तरी नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतक-यांनी जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.