खामनदी पात्रातील अवैध बांधकामांवर कारवाई करा file photo
छत्रपती संभाजीनगर

खामनदी पात्रातील अवैध बांधकामांवर कारवाई करा

मनपा आयुक्तांचे अतिक्रमण हटाव विभागाला आदेश : पिचिंगची कामेही गतीने करा

पुढारी वृत्तसेवा

Take action against illegal constructions in the Kham Riverbed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

खाम नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यासाठी आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोमवारी (दि.२३) नदीपात्राची पाहणी केली. या वेळी नदीचे वैज्ञानिक सीमांकन, खोलीकरण व रुंदीकरणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच नदीपात्रातील आणि ऐतिहासिक वास्तूंजवळील अवैध बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचा आदेश देत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

बारपुल्ला दरवाजापासून हसूल तलावापर्यंतच्या सुमारे ६.५ किलोमीटर परिसरात नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि पिचिंगची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नदीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी ब्लू लाईन आणि रेड लाईन मार्किंग करून अचूक सीमांकन करण्यावर भर देण्यात आला.

कामाची गती वाढवण्यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करून गरम पाणी ते बाराप-ल्ला गेट आणि हिमायत बाग ते बाराप-ल्ला गेट अशा भागांत विभागणी करण्यात आली आहे. पाहणीदरम्यान आयुक्तांनी ऐतिहासिक बारपुल्ला गेट परिसरातील अतिक्रमणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. एकेकाळी बारा पुल्लांसाठी प्रसिद्ध असलेली ही वास्तू आता अतिक्रमणामुळे बाधित झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

नदीपात्रात आणि फसील बाहेरील अनधिकृत बांधकामांमुळे नदीचा प्रवाह अडथळीत होत असून, यामुळेच पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते, असे त्यांनी स्पष्ट केले. मान्सूनपूर्वी रुंदीकरण व इतर कामे पूर्ण करून पूरस्थिती टाळण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. खाम नदीला शहरासाठी शाप न ठरता एक ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा म्हणून विकसित करण्यावर आयुक्तांनी भर दिला. पाहणी दौऱ्यात वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पाशी संबंधित प्रतिनिधींची उपस्थिती होती.

स्वच्छतागहाचा वापर स्टोर रूमसाठी

अतिक्रमण विभागाला अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. नदीपात्रातील सर्व अनधिकृत बांधकामे हटवून मूळ प्रवाह पुनर्संचयित करण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय, वारपुल्ला गेटलगतचे सार्वजनिक स्वच्छतागृह स्टोअर रूम म्हणून वापरले जात असल्याचे निदर्शनास येताच ते तत्काळ रिकामे करून नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT