Sugarcane price of Rs 2500, anger among farmers and Swabhimani Shetkari Sanghatana
पैठण, पुढारी वृत्तसेवा पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या उसाला साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमान शेतकरी संघटनेने केली होती. परंतु तालुक्यातील गूळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्यांनी २५०० रुपये उसाला दर बुधवारी (दि.१९) जाहीर केल्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमान शेतकरी संघटनेत संतापाची लाट निर्माण होऊन ऊस कारखानदाराविरुद्ध व्यापक स्वरूपात आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.
पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असून, या उसावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत. तालुक्यात दोन साखर कारखाने व दोन गूळ पावडर निर्मिती करणारे कारखाने आहेत. या कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ऊस दर चालू गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमान शेतकरी संघटनेने केली होती.
ऊस दर जाहीर होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देऊ नये, अशा स्वरूपाचे आवाहन करून आंदोलन सुरू केले होते. दि. २८ ऑक्टोबर रोजी कारखान्यांना तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष ज्ञानदेव मुळे यांनी निवेदन देऊन दि. १९ नोव्हेंबरपर्यंत संबंधित कारखान्यांनी ऊस दर जाहीर करून गाळप हंगाम सुरू करावा, अशी मागणी केली होती.
यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुलमेश्वर नॅचरल शुगर प्रा. लि. ब्रह्मनाथनगर नवगाव, ता. पैठण या गूळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्याने चालू हंगामात उसाला २५०० चा दर जाहीर केल्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यापक स्वरूपात आंदोलन उभारण्याचा पवित्रा घेतला आहे.