छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागांना साठेबाजांची दुकाने, गोडाऊन, कंपन्या, बेकरी व्यावसायिकांवर धाडी टाकून तपासणीचे आदेश दिले आहेत. परंतु, जिल्ह्यात साखर होलसेल विक्रेते नेमके किती, याबाबत जिल्हा पुरवठा विभगालाच माहिती नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांचा शोध घेऊन धाडीसत्रांना सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात १९ ऑगस्ट रोजी अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (१९५५ चा १०) च्या कलम ३ च्या उप कलम ३ च्या उप कमल (१) नुसार साखर साठेबाजीबाबत आदेश जारी केले आहेत. याबाबत सर्व राज्यांना आदेश प्राप्त झाल्यानंतर सोमवारी राज्य पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा विभागांना पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबत माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी म्हणाले की, शासन आदेशानुसार शहर आणि जिल्ह्यातील सर्व साखर साठेबाजांची तपासणी करण्यात येणार आहे.
या आदेशानुसार १ ऑगस्ट ते १ नोव्हेंबरपर्यंत होलसेल विक्रेते, शितपेय उत्पादक, बेकरी, मिठाई विक्रेते, अन्नप्रक्रिया उद्योग यांना १० मेट्रीक टनपेक्षाअधिक साखर साठा प्रत्येक महिन्यात १५ दिवसच राखून ठेवता येणार आहे. जास्त कालावधीसाठी साखर साठा करून ठेवल्यास संबंधितांवर कारवाईचे आदेश शासनाने दिले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांची करण्यात आली असल्याचे डीएसओ फुलारी यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी माहिती देताना डीएसओ फलारी म्हणाले की, प्रशासनाकडे सध्या जिल्ह्यात होलसेल विक्रेत्यांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे तपासणीवर आतापासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आदेश येताच डी मार्टवर धाड
शासनाने सोमवारी दुपारी साखर साठेबाजांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला दिले. त्यावरून दुपारनंतर डीएसओ यांच्या पथकाने हडको कॉर्नर येथील डी मार्ट मॉलमध्ये धाड मारली. या तपासणीत डी मार्टकडे १२ क्विंटल साखर साठा उपलब्ध असल्याचे आढळून आले, असे डीएसओ प्रवीण फुलारी यांनी सांगितले.
आदेश यांना लागू नसेल
या आदेशातील तरतुदी केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अखत्यारीतील कोणत्याही संस्थांना लागू राहणार नाही. यात प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने, शासकीय गोडाऊन व इतर संस्थांचा समावेश असल्याचे शासन आदेशात नमुद आहे, असे डीएसओ प्रवीण फुलारी यांनी सांगितले.
१० पथक नियुक्त
जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयांतर्गत जिल्हा पुरवठा विभागाने एक पथक नियुक्त केले आहे. तर एक पथक डीएसओ आणि अन्रधान्य वितरीन विभागाने असे एकूण १० पथक सज्ज करण्यात आले आहे. हे पथक दुकान, गोडाऊन, कंपन्या, बेकऱ्यांची तपासणी करतील, असेही त्यांनी सांगितले.