

नांदेड : शहरातील गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय परिसरात अंमली पदार्थांचे घटक असलेल्या औषधी सिरपची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन जणांना अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने रंगेहाथ पकडले. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून १०० अमली सिरपच्या बाटल्या, दोन मोबाईल आणि एक स्कूटी असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धर्माजी भिवा दुधाडे (वय ३५, रा. बालाजीनगर, हिंगोली नाका, नांदेड; मूळ रा. आमदरी, ता. भोकर) आणि मोहम्मद मुनवर अन्सारी युसुफोद्दीन अन्सारी (वय २३, रा. तुराब उल हक नगर, दर्गा रोड, परभणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कारवाईचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत बंदी असलेले 'Triprolidine Hydrochloride Codein Phosphate' हा घटक असलेले सिरप नशेसाठी वापरले जाते. आरोपी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी या सिरपची खरेदी-विक्री करत असल्याची गुप्त माहिती टास्क फोर्सला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय परिसरात सापळा रचून टीव्हीएस स्कूटी (क्र. MH-26-CM-5666) वरून आलेल्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी अमली पदार्थ टास्क फोर्सचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनमंत मानेजी जक्केवाड यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद (गु.र.नं. ४२६/२०२६) करण्यात आला आहे. ही कारवाई एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (सी), २१, २२ (बी) आणि २९ अन्वये दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरंटलु करत आहेत.
सिरपच्या तस्करीत 'परभणी-नांदेड' कनेक्शन
नांदेड शहरात परभणीवरून होणाऱ्या अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे कनेक्शन या कारवाईमुळे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद मुनवर अन्सारी हा मूळ परभणीचा असून, तो नांदेडमधील स्थानिक आरोपी धर्माजी दुधाडे याच्या मदतीने हा साठा विकण्याच्या तयारीत होता. तरुण वर्गाला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या अवैध औषध तस्करांचे मूळ नेटवर्क कुठे आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.